Rs 500 Crore Ghost Junction: ब्रिटनमधील एक रिंगरुट घोस्ट जंक्शन म्हणजेच भूताचा वावर असलेलं निर्जन ठिकाण म्हणून (कृ)प्रसिद्ध आहे. मात्र भूताचा वावर असल्याची चर्चा असलेला हा मोटरवे एम 49 लवकरच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे हा अंडाकृती आकाराचा मार्ग असून तो एलिव्हेटेड म्हणजेच जमीनीपासून उंचावर बांधण्यात आला आहे. हा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यासाठी 50 मिलियन पाऊंड स्ट्रेलिंग म्हणजेच भारतीय चलनानुसार 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सध्या या रिंगरुटची जगभरात चर्चा आहे.
एम 49 मार्गावरुन अजून एकाही कार गेलेली नाही. हा मार्ग बांधून 3 वर्ष उलटून गेल्यानंतरही तो वापरासाठी सुरु करण्यात आलेला नाही. हा मार्ग ब्रिटनमधील ग्लॉस्टरशायर शहरामधील एवनमाऊथजवळ सन 2019 मध्ये बांधण्यात आला. हा मार्ग ब्रिस्टलजवळच्या सेवर्न आणि चिटरिंग या दोन शहरांना जोडतो. एवढा खर्च करुन उभारण्यात आलेला हा एलिव्हेटेड मार्ग मागील 3 वर्षांपासून बंदच आहे. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करुनही या मार्गाचा वापर अद्याप एकाही कारने केलेले नाही.
हा मार्ग ज्या हायवेवर बांधण्यात आला आहे त्याला लागून असलेले लिंक रोड तसेच समांतर रोड उपलब्ध नव्हते. त्यामुळेच चालकांना सेवर्नसाइड इंडस्ट्रियल इस्टेट, अॅमेझॉन गोदामं, टेस्को आणि लिडल यासरख्या ठिकाणी पोहचण्यासाठी मोठा फेरा मारुन यावं लागायचंय. त्यावर उपाय म्हणून हा हवेतील पुलासारखा रिंगरुट पद्धतीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात आला. पण तो वापरण्यात आलेला नाही. हा मार्ग 'घोस्ट जंक्शन' म्हणून स्थानिकांमध्ये ओळखला जातो. आता हाच मार्ग सुरु करण्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत असल्याचं दिसत आहे.
साऊथ ग्लॉस्टरशायर काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार 160 मीटर लांबीचा हा मार्ग सुरु करण्यासाठी संबंधित यंत्रणाकडे निवेदन पाठवण्यात आलं आहे. या निवेदनाची दखल घेतली तरी हा मार्ग सुरु होऊ शकतो. मोटरवे राउंडबाऊटला स्थानिक बिझनेस पार्कला जोडण्यासाठी रस्ते उभारण्यासाठी परिवहन विभागाकडून 7 मिलियन पाऊंड स्ट्रेलिंग म्हणजेच 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
हा मार्ग बांधून तयार झाल्यानंतरअ नेक वर्षांपासून तो बंदच आहे. बांधून पूर्ण असतानाही या ठिकाणावरुन कोणी येत जात नसल्याने या मार्गावर भूतांचा वावर असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर दबक्या आवाजात होत असते. त्यावरुनच हे नाव पडलं आहे. या रिंगरुटला जोडणाऱ्या मार्गांचं बांधकाम पुढील वर्षभरामध्ये पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. यामुळे वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल असं सांगितलं जात आहे.