मुंबई : तुम्ही कधी बेट गायब झाल्याचं ऐकलं आहे का? नसेल ऐकलं तर आज आम्ही तुम्हाला सांगतो. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेलं एक बेट अचानक गायब झाल्याचं सांगण्यात येतंय. इतकंच नाही तर हे बेट गुगल मॅपवरही दिसत नसल्याची माहिती आहे.
वास्तविक, जेम्स कुक नावाच्या व्यक्तीने 1774 मध्ये पॅसिफिक महासागरात एक बेट असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्याच्या नावावरून त्या बेटाचं नाव कुक आयलंड ठेवण्यात आलं. पण नंतर त्या बेटाचे नाव सँडी आयलंड असं झालं. पण आता संशोधकांनी सांगितलं आहे की, पॅसिफिक महासागरात असं कोणतंही बेट नव्हतं.
यानंतर हे बेट गुगल मॅपवरूनही हटवण्यात आलंय. मात्र, जेव्हा संशोधकांनी या बेटाची सत्यता सांगितली तेव्हा लोकांची तारांबळ उडाली. याआधी हे बेट गुगलवर पाहता येत होतं, पण जेव्हा संशोधकांनी हे बेट नसल्याचा धक्कादायक खुलासा केला तेव्हा गुगलनेही ते नकाशावरून काढून टाकलंय.
एका दाव्यानुसार, जेम्स कुक यांनी 1774 मध्ये या बेटाचा शोध लावला होता. या बेटाची लांबी 22 किलोमीटर आणि रुंदी 5 किलोमीटर असण्याची शक्यता जेम्स कुक यांनी व्यक्त केली होती. वेलोसिटी नावाच्या जहाजाने 1876 साली सँडी बेटाच्या अस्तित्वाचा दावा केला होता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ब्रिटेन आणि जर्मनीनेही त्यांच्या 19व्या शतकातील नकाशांमध्ये हे बेट असल्याचा दावा केला होता.
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनादरम्यान नोव्हेंबर 2012 मध्ये असं आढळून आलं की, हे बेट त्या ठिकाणी नाहीये. शास्त्रज्ञांनी या ठिकाणी समुद्राची खोली मोजली असता ती खोली 4,300 फुटांपेक्षा जास्त नसल्याचं आढळून आलं.
युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीचे मुख्य भूगर्भशास्त्रज्ञ मारिया सेटन म्हणाले की, काहीतरी चूक झाली असावी. यानंतर एक पेपरही प्रकाशित झाला ज्यामध्ये सँडी बेट नसल्याची खातरजमा करण्यात आली.