Corona Lockdown मुळं चार वर्षांपूर्वी चंद्रावर... संशोधकांकडून अनपेक्षित खुलासा

Covid Lockdown Effect on Moon: कोरोना लॉकडाऊननं फक्त पृथ्वीवर, जीवसृष्टीवरच नव्हे, तर थेट चंद्रावरही परिणाम केला. कसा? पाहा संशोधनातून समोर आलेली माहिती...   

सायली पाटील | Updated: Sep 30, 2024, 09:31 AM IST
Corona Lockdown मुळं चार वर्षांपूर्वी चंद्रावर... संशोधकांकडून अनपेक्षित खुलासा  title=
Corona Covid Lockdown Effect on Moon latest update

Covid Lockdown Effect on Moon: कोरोना... फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांनाच धडकी भरते. साधारण 4 वर्षांपासून या महामारीनं जगभरात थैमान घातलं आणि पाहता पाहता ही दहशत वाढतच गेली. घड्याळाच्या वेगानं धावणाऱ्या जगाचा वेग याच कोरोना महामारीमुळं मंदावला. पण, या साऱ्यामध्ये काही गोष्टींवर सकारात्मक परिणामही दिसून आले. त्यात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल होता तो म्हणजे निसर्गावर दिसणाऱ्या परिणामांचा. 

कोरोना काळात किंबहुना कोरोना लॉकडाऊनमध्ये जिथं मानवी आयुष्यावर अनेक निर्बंध आले, तेव्हात निसर्गानं मात्र खऱ्या अर्थानं त्याचं सुरेख रुप सर्वांपुढे आणलं. कोरोना लॉकडाऊन काळात अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारली, तर कैक भागांमध्ये वनांपासून वनस्पती आणि प्राणीमात्रांना मानवी हस्तक्षेपाशिवाय आयुष्य जगण्याची संधी मिळाली. एकिकडे संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असतानाच दुसरीकडे थेट चंद्रावरही याचे परिणम दिसून आले. 

भारतातील काही संशोधकांच्या अध्ययनानुसार 2020 च्या एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान चंद्राच्या पृष्ठावरील तापमानात असामान्य घट नोंदवण्यात आली. Royal Astronomical Society: Letters च्या मासिक पत्रकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निरीक्षणपर अहवालामुळं पृथ्वी आणि चंद्र एकमेकांशी किती संलग्न आहेत याचीच माहिती यामुळं समोर आली. सदर संशोधनासाठी  (PRL) म्हणजेच फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीनं नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ची मदत घेतली. यामध्ये 2017 ते 2023 दरम्यान चंद्रावर सहा विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेल्या बदलांचं निरीक्षण केलं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : सप्टेंबरचा शेवट अन् ऑक्टोबरची सुरुवात पावसानं; त्यानंतर मात्र... 

 

निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार इतर वर्षांच्या तुलनेत लॉकडाऊन काळात चंद्राच्या पृष्ठावर तापमानाच सातत्यानं 8-10 केल्विन इतकी घट नोंदवण्यात आली. पृथ्वीवरील अनेक कारखाने, मोठाले प्रकल्प, वाहनं आणि इतर प्रदूषणकाही घटक ठप्प असल्यामुळं यादरम्यान हरितवायू निर्मितीमध्ये लक्षणीय घट झाली. याचा परिणाम पृथ्वीच्या वातावरणात होऊन तिथं कमी उष्णतेची निर्मिती झाली आणि त्यामुळं कमी उष्णता उत्सर्जित झाली. PRL च्या निरीक्षणानुसार यादरम्यानच्या काळात पृथ्वीवरील रेडिएशनमध्ये घट झाली, ज्यामुळं चंद्राच्या पृष्ठावरील तापमानात घट झाली. 

लॉकडाऊन संपताच... 

जवळपास 12 वर्षांच्या तापमानाचा आढावा घेतल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये साइट-2 वर सर्वात कमी 96.2 K तापमानाची नोंद करण्यात आली होती. तर, 2022 मध्ये साइट-1 वर सर्वात कमी तापमान होतं 143.8 K. म्हणजेच लॉकडाऊन काळात चंद्राच्या बहुतांश भागांमध्ये तापमानाच लक्षणीय घट नोंदवण्यात आलेली असली तरीही 2022 मध्ये अर्थात लॉकडाऊन संपल्यानंतर ही घट बहुतांशी कमी झाली.