कोरोनाने वाढवल्या चिंता, नव्या व्हेरियंटचा ब्रिटनमध्ये कहर, रशियात मृत्यू वाढले

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका पुन्हा वाढतोय... 

Updated: Oct 20, 2021, 06:37 PM IST
कोरोनाने वाढवल्या चिंता, नव्या व्हेरियंटचा ब्रिटनमध्ये कहर, रशियात मृत्यू वाढले title=

मुंबई : जगभरातील लसीकरण (Vaccination) मोहीम सुरु असूनही, कोरोना (corona) महामारी नियंत्रित होत नाहीये. तरीही अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होत आहे. अमेरिकेत अजूनही सरासरी दीड हजार मृत्यू होत आहेत. रशियामधील परिस्थिती चिंताजनक आहे. ब्रिटनमधून भीतीदायक बातमी येत आहे, जिथे अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला कोविडविरोधी लसीचे दोन्ही डोस दिले असूनही दररोज 40 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्रकारातही उत्परिवर्तन झाले आहे, ज्याचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे.

यूके मध्ये डेल्टा व्हेरिएंट बदलला

वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार, इंग्लंडमधील कोरोनाच्या डेल्टा प्रकारात एक नवीन उत्परिवर्तन झाले आहे जे वेगाने पसरत आहे. यावर लक्ष ठेवले जाते आणि त्याचे मूल्यांकन केले जाते. देशाच्या आरोग्य संरक्षण संस्थेने म्हटले आहे की, डेल्टाच्या नवीन प्रकारावर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. याला AY.4.2 असे नाव देण्यात आले आहे. एवढेच नाही तर डेल्टाच्या E-484K आणि E-484Q प्रकारांची नवीन प्रकरणेही येत आहेत.

ब्रिटनमध्ये एका दिवसात 223 जणांचा मृत्यू झाला

ब्रिटनमधील आरोग्य प्रमुखांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही उपाययोजना कायदेशीररित्या अंमलात आणाव्यात असे सरकारला आवाहन केले आहे. या उपायांमध्ये अनिवार्यपणे मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे. ब्रिटनमध्ये दररोज कोरोना संसर्गाची 40 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. ब्रिटनमध्ये मंगळवारी एकाच दिवसात 43,738 हजार प्रकरणे नोंदवली गेली तर 223 लोकांचा मृत्यू झाला. मार्चनंतर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची ही सर्वाधिक संख्या आहे.

अमेरिकेत पूर्वीच्या तुलनेत नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु तरीही साथीच्या आजारामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. 19 ऑक्टोबर रोजी अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स' च्या कोविड टॅलीनुसार, अमेरिकेत संक्रमित सात दिवसांची सरासरी आकडेवारी 79,348 नोंदवली गेली, तर साथीच्या आजाराने सरासरी मृत्यूची संख्या 1557 नोंदवली गेली. आतापर्यंत अमेरिकेत कोरोना संसर्गाची 45,996,507 प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर साथीमुळे 7,48,652 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका हा साथीच्या आजाराने सर्वाधिक प्रभावित देश आहे.

रशियामध्ये परिस्थिती बिघडली, एका दिवसात 1,028 लोकांचा मृत्यू झाला

रशियातील परिस्थिती बिकट होत आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, रशियामध्ये एका दिवसात 34,073 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर साथीमुळे 1,028 लोकांचा मृत्यू झालाय. रशियामध्ये आतापर्यंत 226,353 लोकांचा साथीमुळे मृत्यू झाला आहे तर संक्रमित लोकांची संख्या 8,094,825 वर पोहोचली आहे. रशियामध्ये कोरोनामुळे सर्वाधिक दैनंदिन मृत्यू होतात, 24 तासांमध्ये 1,028 रुग्णांचा मृत्यू झालाय. रशियन मंत्रिमंडळाने असे सुचवले आहे की साथीचा रोग टाळण्यासाठी एक आठवड्याची सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.

ब्राझीलमध्ये 390 आणि मेक्सिकोमध्ये 446 लोकांचा मृत्यू झाला

ब्राझीलमधील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासांत 12,969 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 390 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 21,664,879 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर साथीमुळे 603,855 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, मेक्सिकोमध्ये गेल्या 24 तासांत 446 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, ज्यात साथीच्या आजारांमुळे मृतांची संख्या वाढून 284,923 झाली आहे. मेक्सिकोमध्ये कोरोना बाधितांची संख्या 3,762,689 आहे.