अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोक्का; आता अटकेची कारवाई

Donald Trump News : कधी एकेकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणारे आणि त्याहीआधीपासून चर्चेचा विषय ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची ही मोठी बातमी.   

सायली पाटील | Updated: Aug 22, 2023, 10:26 AM IST
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोक्का; आता अटकेची कारवाई title=
donald trump former us president to surrender atlanta police

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : Donald Trump News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा नजरा वळवताना दिसत आहेत. कारण, त्यांच्याबद्दलची लक्षवेधी माहिती नुकतीच समोर आली आहे. अधिकृत सूत्रांच्या महितीनुसार गुरुवारी जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात ते पोलिसांना शरण जाणार आहेत. 2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आणि त्यांच्या 17 साथीदारांनी मिळून जॉर्जियामधील निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

जॉर्जियातील कायद्यानुसार अटलांटा जिल्हा न्यायालयात ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ट्रम्प यांना अटकपूर्व जामिनासाठी 2 लाख डॉलरचा जाचमुचला भरण्याचा आदेश दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी आपण शरण जाऊन अटक होणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. 

निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप 

2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभव झाल्यानंतर त्यांनी जॉर्जियामधील निवडणूक अधिकाऱ्यांना केलेल्या एका फोनचं रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यात  राष्ट्राध्यक्षपदी असताना त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारायल्याचं पुढे आलं आहे. ट्रम्प यांचे तत्कालीन साथीदार आणि उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार माईक पेन्स यांची सुमारे अकरा हजार मतं कुठे गेली याचं उत्तर द्या, असं ट्रम्प यांनी जॉर्जियामधील मतमोजणी अधिकाऱ्यांना धमकीच्या स्वरात विचारलं होतं. 

सदर प्रकरण हा सरळ सरळ निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप असल्याचा आरोप लावून ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्यात यावा असा आदेश अटलांटा जिल्हा न्यायाधीशांनी चालू महिन्याच्या सुरुवातीला दिला. मुख्य म्हणजे ट्रम्प यांच्यावर निवडणुकीत गैरप्रकार करण्याबरोबरच रिको कायद्यातंर्गतही आरोप निश्चित करण्यात आला आहे. रिको कायदा हा अमेरिकेतील सामूहिक गुन्हेगारी रोखण्यासाठी केलेला कायदा आहे. आपल्याकडील मोक्का कायद्याशी मिळता जुळता असा हा रिको कायदा  आहे.

हेसुद्धा वाचा : आजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?

 

मागील पाच महिन्यांत ट्रम्प यांच्यावर निवडणुकीत गैरप्रकार करुन निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याची चार आरोपपत्र वेगवेगळ्या राज्यात दाखल करण्यात आली आहेत. ट्रम्प यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. शिवाय डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचं प्रशासन पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करत आहेत असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.