अमेरिकेच्या धोरणामुळे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे सुमारे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 6, 2017, 10:33 AM IST
अमेरिकेच्या धोरणामुळे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे सुमारे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत.

अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेल्या ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रशासनाने घेतलेले अनेक निर्णय बदलले आहेत. ओबामा प्रशासनाचे एमनेस्टी धोरणही त्यापैकीच एक. या धोरणानुसार अवैध पद्धतीने अमेरिकेत आलेल्या लोकांना तेथे नोकरी करण्याचा परवाना देण्यात आला होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाने हे धोरण रद्द केले. बदललेल्या निर्णयामुळे सुमारे ८००० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. यात ७००० हून अधिक अमेरिकास्थित भारतीय आहेत. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी म्हटले आहे की, डीएसीएच्या (डिफर्स अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल) प्रभावाखाली येऊन ओबामा प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. पण, आता तो रद्द करण्यात आला आहे.

पुढे बोलताना सेशन्स यांनी यांनी म्हटले आहे की, यापुढे आम्ही अवैध पद्धतीने अमेरिकेत येऊ पाहणाऱ्या कामगारांना इथे येऊ देणार नाही. ओबामांनी सुरू केलेला एमनेस्टी कार्यक्रम हा घटनाबाह्य होता. या कार्यक्रमामुळे हजारो अमेरिकी तरूणांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या जात होत्या. ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष आहेत, जे या मुद्दयावर बोलत आहेत.

दरम्यान, ट्रम्प यांच्या या धोरणाविरूद्ध अमेरिकेत जोरदार मोहीम सुरू झाली आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी व्हाईट हाऊसबाहेर शेकडो आंदोलक एकवटले होते.