मुंबई : शेतमाल आणि कृषी व्यवसायाकडे मागील काही दिवसांमध्ये अधिकजणांनी आपले पाय वळवले आहेत. शेतीविषयक आणि शेतीशी निगडीत अथवा पूरक अशा व्यवसायांना अनेकांनीच प्राधान्य दिलं असून, दिवसागणिक हा व्यवसाय आणखी खुलत असताना दिसत आहे. किंबहुना अमुक तासांच्या नोकरीमध्ये जितकी मिळकत मिळत नाही, तितका नफा या क्षेत्रामध्ये नोंदवला जात आहे.
शेतीविषयक या कामांमध्ये शेतमाल, भाजीपाल्याची खुडणी करणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती मात्र या साऱ्याला अपवाद. पण, ब्रिटनमधील लिंकनशायर (Lincolnshire) मध्ये मात्र या समजुतीला शह दिला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं ब्रोकोली पिकाची खुडणी करण्यासाठी एका फार्मिंग कंपनीनं मजुरांना 62,400 पाऊंड इतकं पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. वर्षाला जवळपास 63 लाख रुपये.... बसला ना धक्का?
काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार शेतात ब्रोकोलीची खुडणी करण्यासाठीही ही नोकरी 'टी एच क्लेमेंट्स अँड सन' तर्फे देण्यात येत आहे. सोशल मीडियावर या नोकरीसाठी करण्यात आलेल्या जाहिरातीचे फोटो अनेकांच्याच नजरा वळवत आहेत. पूर्ण वर्षासाठी शेतात कोबी आणि ब्रोकोलीची खुडणी करुन एक व्यक्ती जवळपास 62 लाख रुपये कमवू शकतो. याचाच अर्थ असा की, एका तासाला या व्यक्तीच्या खिशात 30 पाऊंड म्हणजेच भारतीय प्रमाणानुसार 3 हजार रुपये जातील.
का दिला जातोय इतका पगार?
सध्याच्या घडीला युकेमध्ये शेतात काम करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. यामुळं सरकार सीजनल अॅग्रीकल्चरल वर्कर्स स्कीमअंतर्गत कामगारांना 6 महिने वेगळ्या ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी देत आहे. फक्त शेतीच नव्हे, तर इथं अनेक क्षेत्रांमध्ये हीच परिस्थिती आहे. ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला कामगारांची मोठी मागणी असून, त्यासाठी सरकार मोठी किंमतही मोजण्यास तयार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार युकेमध्ये सध्या कामगारांच्या पगारात सध्याच्या दिवसांमध्ये तब्बल 75 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.