अग्निशमन दलाच्या 'त्या' कर्मचाऱ्याने पंतप्रधानांशी हस्तांदोलन नाकारले

या प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Jan 5, 2020, 06:26 PM IST
अग्निशमन दलाच्या 'त्या' कर्मचाऱ्याने पंतप्रधानांशी हस्तांदोलन नाकारले title=

सिडनी: सध्या संपूर्ण जगात ऑस्ट्रेलियात लागलेल्या भीषण वणव्याची चर्चा आहे. या आगीत आतापर्यंत ५ कोटी जंगली प्राण्यांचा बळी गेला आहे. तसेच अनेक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात मोठे बचावकार्य सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन न्यू साऊथ वेल्स येथील कोबार्गो येथे पाहणी करायला आले होते. मात्र, यावेळी त्यांना अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांच्याशी साधे हस्तांदोलन करायलाही नकार दिला. या प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

यापैकी एका व्हीडिओत पंतप्रधान स्कॉट मॉरिसन बचावकार्यात सहभागी झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याशी हस्तांदोलन करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्याने पंतप्रधानांशी हस्तांदोलन करायला थेट नकार दिला. मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची बिलकूल इच्छा नाही, असे त्याने परखडपणे पंतप्रधानांना सुनावले. यानंतर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी अधिक काही न बोलता तेथून काढता पाय घेतला. 

तर दुसऱ्या एका व्हीडिओत स्थानिक नागरिक शेलक्या शब्दांत पंतप्रधानांचा उद्धार करताना दिसत आहेत. तुम्हाला येथून एक मतही मिळणार नाही, असे नागरिक त्यांनी थेटपणे सुनावताना दिसत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना येथूनही काढता पाय घ्यावा लागला. 

डिसेंबर महिन्यात देशातील तब्बल पाच राज्यांमध्ये वणव्याने उग्र स्वरुप धारण केले असताना स्कॉट मॉरिसन आपल्या कुटुंबीयांसमवेत हवाई येथे सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ते सिडनीत क्रिकेटपटूंसोबत आनंद साजरा करत होते. यावरून स्कॉट मॉरिसन यांच्यावर सडकून टीका झाली होती. अखेर स्कॉट मॉरिसन सुट्टीचा कालावधी कमी करून परतले होते. यासाठी त्यांनी देशवासियांची माफीही मागितली होती. 

मात्र, अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या या वणव्यात जंगलांची प्रचंड हानी झाली आहे. स्थानिक लोकांनाही याची झळ बसली आहे. आतापर्यंत या आगीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर हजारो हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले आहे.