रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

अमेरिकेतल्या एका डॉक्टरच्या निस्वार्थी कृतीबद्दलची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओकाला येथील डॉक्टरने एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बोन मॅरो दान केले आहे.

Updated: Oct 8, 2023, 03:11 PM IST
रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया title=

Viral News : रुग्णांचे प्राण वाचवणं हे डॉक्टरांचे (Doctor) पहिलं काम असतं. मग शस्त्रक्रिया असो की औषधे गोळ्या काही करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अमेरिकेतल्या एका डॉक्टरने यापेक्षाही पुढे जाऊन त्याच्या रुग्णासाठी काम केलं आहे. फ्लोरिडातल्या (Florida Doctor) एका डॉक्टरने एका रुग्णासाठी अवयवयदान केलं आहे. अमेरिकेतल्या या डॉक्टरने एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान केल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणतेही प्रयत्न करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच काहीसा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडला आहे. फ्लोरिडा येथील एका डॉक्टराला फोन आली की त्याचा बोन मॅरो एका मुलाशी जुळत आहे. तेवढ्यात त्या डॉक्टराने बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्याचा बोन मॅरो दान केला. डॉक्टरचा हा किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक त्याच्या कामाचे खूप कौतुक करत आहेत.

गुडन्यूज मूव्हमेंट या इन्स्टाग्राम चॅनेलने या अमेरिकन डॉक्टरची गोष्ट सोशल मीडियाव शेअर केली आहे. गुडन्यूजने इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी स्पेशालिस्ट, एमडी, डॉ. अली अलसमारा यांची ही कौतुकास्पद गोष्ट देखील शेअर केली. डॉ. अलसामारा हे ओकाला, फ्लोरिडा येथील डॉक्टर आहेत. गुडन्यूजने दिलेल्या माहितीनुसार डॉ. अलसमारा यांचा फोन आला की त्यांचा बोन मॅरो एका आजारी मुलाशी जुळत आहे. मुलाला याची नितांत गरज आहे, असे डॉ. अलसमारा यांना सांगण्यात आले होते. डॉ. अलसमारा यांनी कसलाही विचार न करता त्यांचा बोन मॅरो दान करुन टाकला.

"मला थोडे दुखत आहे, पण मी मदत करू शकलो याचा आनंद आहे. माझा एक मित्र कर्करोगाने ग्रस्त होता आणि एका दात्याने त्याला मदत केली. मलाही यातून प्रेरणा मिळाली. माझ्यामुळे लोकांना इतरांना मदत करण्यासाठी आणि अवयव दान करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आहे," अशी हृदयस्पर्शी  प्रतिक्रिया डॉ. अलसमारा यांनी दिली आहे.

डॉक्टरने हे पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका इंस्टाग्राम युजरने, "तुम्ही वाचवलेले बाळ तुमच्या कायम लक्षात राहील, ही त्याच्या कुटुंबासाठी खास भेट आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. "खूप सुंदर, पृथ्वीला यासारख्या आणखी उदाहरणांची गरज आहे," असे दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे. ही खूप हृदयस्पर्शी घटना आहे. तू हिरो आहेस, अशीही एका युजरने प्रतिक्रिया दिलीय. "डॉक्टर तुम्हाला सलाम, तुम्ही एक धैर्यवान व्यक्ती आहात. तुम्ही महान आहात. याला म्हणतात माणूस असणे. तू स्टारबॉय आहेस. सुपर हिरो आहे," असेही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

बोन मॅरो म्हणजे काय?

अस्थिमज्जा (बोन मॅरो) म्हणजे हाडांमधील जागा आहे जी लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रक्त पेशी तयार करते. लाल रक्त पेशी शक्ती देतात आणि पांढऱ्या रक्त पेशी रोगांशी लढण्यासाठी शक्ती देतात.