मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी इतिहास रचला आहे. अदानी आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यासह अदानी यांनी क्रमवारीत बर्नार्ड अर्नॉल्टला (Bernard Arnault) मागे टाकले आहे. फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सने (Forbes billionare Index) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान अदानी यांची एकूण संपत्ती किती आहे ? व अदानी यांच्याकडे इतका पैसा कुठून येतो? याची माहिती जाणून घेऊयात.
फोर्ब्सचा रिअल टाईम इंडेक्स
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Forbes billionare Index), गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. आज दुपारपर्यंत अदानी यांच्या संपत्तीत 5.5 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे आता ते 155.7 अब्ज डॉलर्ससह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर पहिल्या क्रमांकावर एलन मस्क (Elon Musk) आहेत. एलन मस्कची एकूण संपत्ती 273.5 अब्ज डॉलर आहे. एलन मस्क नंतर दुसऱ्या क्रमांकावर अदानी आहे. अदानी यांच्यानंतर बर्नार्ड अर्नॉल्ट 155.2 अब्ज डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या इंडेक्समध्ये रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीबद्दल बोललो तर ते या यादीत 92.6 अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहेत.
ब्लूमबर्ग इंडेक्समध्ये तिसऱ्या स्थानी
ब्लूमबर्गच्या बिलियनेअर्स इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) एलन मस्क (Elon Musk) 264 अब्ज डॉलरसह पहिल्या स्थानी आहेत.तर जेफ बेझोस 150 अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानी आहे. तर गौतम अदानी (Gautam Adani) या इंडेक्समध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 149 अब्ज डॉलर आहे. अदानीनंतर बर्नार्ड अर्नॉल्ट यांचा क्रमांक लागतो. 139 बिलियन डॉलरसह चौथ्या स्थानी आहे.
संपत्तीचा स्त्रोत काय?
अदानीच्या (Gautam Adani) संपत्तीचा मोठा हिस्सा अदानी समूहाच्या सार्वजनिक भागभांडवलातून प्राप्त होतो. मार्च 2022 च्या स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगनुसार, त्यांच्याकडे अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये 75% हिस्सा आहे.त्यांच्याकडे अदानी टोटल गॅसचा 37%, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा 65% आणि अदानी ग्रीन एनर्जीचा 61% हिस्सा आहे. या सर्व कंपन्या सार्वजनिकपणे व्यापार करतात.
दरम्यान जगभरात गौतम अदानी (Gautam Adani) दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) याच क्रमवारीत आठव्या स्थानी आहे. देशातून हे दोनचं श्रीमंत व्यक्ती या आकडेवारीत आहेत. या आकडेवारीत अदानी यांनी मोठी झेप घेतली आहे.