Global Warming : जागतिक तापमानवाढीची समस्या सध्या अनेकांचीच चिंता वाढवताना दिसत आहे. इतकंच काय, तर तज्ज्ञ मंडळींपुढंही आता संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीतून भविष्यातील विदारक स्थिती उपस्थित झाल्यामुळं ही मंडळीसुद्धा विचारात आहेत.
जगभरातून सातत्यानं होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामुळं जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या येत्या दशकांमध्ये समस्त जीवसृष्टीसाठी धोका निर्माण करताना दिसत आहे. दर दिवशी तापमानवाढ होणाऱ्या पृथ्वीचं सरासरी तापमान या वर्षअखेरीपर्यंत जर दोन अंशंनी तरीही वाढ झाली तरीही या शतकाच्या मध्यापर्यंत तापमानवाढीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 370 टक्क्यांनी अर्थात पाचपटींनी वाढू शकतं.
लॅन्सेटच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली. यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार वर्षअखेरीपर्यंत पृथ्वीचं तापमान दीड अंशांहून जास्त वाढू न देण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरु आहेत. याच अहवालासंबंधी वक्तव्य करताना लॅन्सेटशी संबंधित मरीना रोमानेलो म्हणाले, 'जलवायु परिवर्तनामुळं अब्जोंच्या संख्येनं नागरिकांचा जीव धोक्यात आहे, अनेकांनाच याची किंमत मोजावी लागत आहे. 2 अंशांनी होणारी जागतिक तापमानवाढ संपूर्ण जगाच्या दृष्टीनं भविष्यातील धोक्याकडे लक्ष वेधते.'
रोमानेलो यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगातून दर सेकंदाचा 1,337 टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. त्यामुळं आता या कार्बन उत्सर्जनावर आळा घालण्यासाठीच देशोदेशीच्या शासनानं प्रयत्न करावा हाच उपाय त्यांनी सुचवला. जागतिक तापमानवाढीचा आकडा नियंत्रणात आणण्यात जर यश मिळालं तर ,भविष्याच्या दृष्टीनं हे अतिशय सकारात्मक वळण असेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक तापमानवाढीत सरासरी लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. 1880 नंतर जागतिक तापमनाचा आकडा सरासरी एक अंशांनं वाढला. ही एक सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे, संशोधकांच्या मते 2035 पर्यंत तापमानाचा हा आकडा मोठ्या फरकानं वाढू शकतो.
जागतिक तापमानात होणाऱ्या या वाढीमुळं वादळ, पूर, वणवा, दुष्काळ आणि साथीचे आजार अशा अनेक समस्या डोकं वर काढू शकतात. दुसरा एक धोका म्हणजे समुद्राच्या पाणीपातळीत होणारी वाढ. वाढत्या तापमानामुळं महाकाय ग्लेशिअर वितळून त्यांच्या पाण्यामुळं समुद्राच्या पाणीपातळीतही वाढ होताना दिसत आहे, ज्यामुळं कोरोनासारखे आजार पुन्हा डोकं वर काढण्याचा इशाराही फार आधीच संशोधतांनी जागतिक संघटनांना देत सतर्क केलं आहे.