मराठमोळ्या हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

कुलभूषण जाधव प्रकरणात हरीश साळवे यांनी पाकिस्तानला तोंडावर पाडलं होतं

Updated: Jan 17, 2020, 12:14 PM IST
मराठमोळ्या हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे मराठमोळे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झालीय. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केलीय. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल म्हणून काम पाहतील. १६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होणार आहे. ब्रिटिश सरकारच्या माहितीनुसार, महाराणीनं ११४ वकिलांना QC म्हणून नियुक्त केलंय. याशिवाय १० वकिलांचा सन्मान करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. 

इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी महाराणीचे वकील (QC) म्हणून हरीश साळवे यांना नियुक्त करण्यात आलंय. ब्रिटिश महाराणीकडून हे पद वकिलांचं विशेष कौशल्य पाहून प्रदान करण्यात येतं. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर हरीश साळवे यांच्या नाव प्रसिद्ध आहे. त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलंय. १९८० मध्ये त्यांनी वकिली सुरू केली. हरीश साळवे यांची १९९२ मध्ये दिल्ली हायकोर्टानं ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली. १९९९ ते २००२ पर्यंत त्यांनी देशासाठी सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं. या दरम्यान त्यांनी देश-विदेशातील मोठ-मोठी प्रकरणं मोठ्या हुशारीनं सांभाळली. 

२०१९ साली आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची बाजू हरीश साळवेंनीच मांडली होती. या प्रकरणात पाकिस्तानला त्यांनी तोंडावर पाडलं. परंतु उल्लेखनीय म्हणजे या केससाठी त्यांनी नाममात्र एक रुपया फी म्हणून घेतली होती. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी केवळ एक दिवस अगोदर हरीश साळवे यांना फोन करून आपली फी घेऊन जाण्याची विनंती केली होती. 

हरीश साळवे मुकेश अंबानी, सलमान खान यांच्यासहीत अनेक प्रसिद्ध व्यक्तींसाठी केस लढलेत. हरीश साळवे एक दिवसासाठी जवळपास ३० लाख रुपयांची फी घेतात, असं म्हटलं जातं.