'अॅपल'ला झटका देत या कंपनीनं मिळवला 'स्टिव्ह जॉब्स' ट्रेडमार्क!

'स्टिव्ह जॉब्स' हे 'ट्रेडमार्क' नोंदवण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यानं 'अॅपल' कंपनीला मोठा झटका बसलाय... 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 30, 2017, 09:43 PM IST
'अॅपल'ला झटका देत या कंपनीनं मिळवला 'स्टिव्ह जॉब्स' ट्रेडमार्क! title=

सॅन फ्रान्सिस्को : 'स्टिव्ह जॉब्स' हे 'ट्रेडमार्क' नोंदवण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यानं 'अॅपल' कंपनीला मोठा झटका बसलाय... आता 'स्टिव्ह जॉब्स' या इटालियन ब्रान्डच्या जीन्स, टी शर्ट, बॅग्स आणि इतर फॅशनेबल गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता. 

'ला रिपब्लिका' या इटलीच्या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर इटालियन दोन भाऊ आपल्या कंपनीला 'स्टिव्ह जॉब्स' नाव देण्यात यशस्वी ठरलेत. 

विन्सेन्झो आणि गियाकोमो बार्बेटो हे दोन भाऊ वर्ष २०१२ पासून 'अॅपल'सोबत कायदेशीर लढाई लढत होते. 


विन्सेन्झो बार्बेटो आणि गियाकोमो बार्बेटो

'अॅपल'नं कधीच 'स्टिव्ह जॉब्स' नावाचं ट्रेडमार्क आपल्या नावावर नोंदवलं नाही हे लक्षात आल्यानंतर या दोन भावांनी याच नावाचं ट्रेडमार्क आपल्या नावावर केलं... यासाठी अॅपलनं त्यांना धडा शिकवण्यासाठी कोर्टात खेचलं... पण झालं उलटंच... 

या दोन भावांनी अगोदर 'स्टिव्ह जॉब्स' हे नाव आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रिसाठी वापरायचं ठरवलं होतं... परंतु, आता मात्र ते हे नाव बॅग, जीन्स, टीशर्ट अशा गोष्टींसाठी वापरणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, 'अॅपल'शी काहीही संबंध नसताना 'स्टिव्ह जॉब्स' या कंपनीचा लोगो 'अॅपल'च्या लोगोशी सामर्म्य राखतोय.