VIDEO:कोरियन विमान 15 मिनिटात अचानक 27000 फूट खाली; प्रवाशांच्या नाकातून रक्त

Korean Air Flight Drop: . हवेचा दबाव वाढल्याने प्रवाशांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. त्यांना टिनिटस आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 25, 2024, 04:34 PM IST
VIDEO:कोरियन विमान 15 मिनिटात अचानक 27000 फूट खाली; प्रवाशांच्या नाकातून रक्त title=
korean airline in airoplan drop

Korean Air Flight Drop: विमानाचा प्रवास जितका जलद आणि सुखकर वाटतो तितकाच तो कधीतरी किती भयावर असू शकतो याची प्रचिती कोरियन प्रवाशांना आलीय. तैवानला जाणारे कोरियन एअरच्या फ्लाइटमध्ये अचानक उंच पातळी सोडून खालच्या बाजूला येऊ लागले. हवेचा दबाव वाढल्याने प्रवाशांच्या नाकातून रक्तस्त्राव, टिनिटस आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. फ्लाइटमधून याचा एक व्हिडीओ बनवण्यात आलाय. जो सोशल मीडियात व्हायरल होतोय.

काय घडलाय प्रकार?

शनिवारी कोरियन एअरचे फ्लाइट 15 मिनिटांत 26,000 फुटांपेक्षा जास्त खाली उतरले. विमानाच्या प्रेशरायझेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्याने हा प्रसंग ओढावला. दरम्यान पायलटने प्रसंगावधन राखत विमान सेऊलला परत नेण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी 7.38 वाजता सोलच्या इंचॉन विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. पण या काळात विमान प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. किमान 13 प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. विमान कंपनीने या घटनेबद्दल माफी मागितली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

विमान 15 मिनिटांत सुमारे 26,900 फूट खाली उतरले. अचानक झालेल्या या घसरणीमुळे केबिन प्रेशर यंत्रणेत बिघाड झाला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमान वेगाने उतरल्यामुळे प्रवाशांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. तर 15 जणांनी कान दुखणे आणि हायपरव्हेंटिलेशनची तक्रार केली. तैपेई टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. विमानातील प्रवाशांसाठी हा प्रवास अगदी रोलर-कोस्टरसारखा होता. दरम्यान 13 प्रवाशांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. यात कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे वृत्त समोर आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chen Yi Ling (@nancy10in)

विमानात मुलांचा आरडाओरडा

फ्लाइटमधील प्रवाशांना जेवण देण्यात आले होते. प्रवासी जेवण करुन आराम करत होते. याच वेळेत ही घटना घडली. काही वेळातच विमानाने उंची सोडली. ज्यामुळे केबिनमध्ये गोंधळ उडाला. प्रवाशांना चक्कर येण्याबरोबरच कान आणि डोक्यात तीव्र वेदना जाणवू लागल्या. विमानात मोठ्या प्रमाणात लहान मुले होती. ही मुले रडायला लागली, आरडाओरडा करायला लागली. फ्लाइट अटेंडंटंनी वेळ न घालवता प्रवाशांसमोर येऊन त्यांना ऑक्सिजन मास्कसंदर्भात मार्गदर्शन केले. काही वेळातच पायलटने विमान पुन्हा इंचॉन विमानतळावर नेण्याचा निर्णय घेतला. तैवानच्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून याला लाखो व्ह्यूज मिळत आहेत.

एअरलाइन्सची प्रतिक्रिया 

कोरियन एअरलाइन्स मॅनेजमेंटने या घटनेबद्दल माफी मागितली आहेय दबाव प्रणालीच्या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक देखभाल प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे. या घटनेमुळे बाधित झालेल्या प्रवाशांना रविवारी दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आल्याची माहितीदेखील यावेळी देण्यात आली.