पृथ्वी 2.0 सापडली? पाणी, माती आणि एलियन्स... हा नवा ग्रह पाहून शास्त्रज्ञही हैराण

Earth Like Planet Found In The Habitable Zone: सर्वात आधी हा ग्रह 2017 साली सापडला. तेव्हापासून या ग्रहाचा अभ्यास केला जात असून आता या ग्रहाबद्दलची फारच रंजक माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनीच याबद्दलचा खुलासा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 10, 2024, 08:24 AM IST
पृथ्वी 2.0 सापडली? पाणी, माती आणि एलियन्स... हा नवा ग्रह पाहून शास्त्रज्ञही हैराण title=
पृथ्वीपासून सर्वात जवळ पहिल्यांदाच सापडला अशा ग्रह (फोटो - ESO.org च्या सौजन्याने)

Earth Like Planet Found In The Habitable Zone: अफाट विश्ववाच्या पसाऱ्यामध्ये केवल पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे का? या प्रश्नाचा माग मागील अनेक शतकांपासून मानव घेत आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर सापडण्याच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे गेल्याचे संकेत नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनातून मिळत आहेत. मॅकमास्टर हा संशोधकांचा असा गट आहे जो आपल्या सौरमालेबाहेर जीवसृष्टी तग धरु शकेल असा ग्रह शोधत आहे. नुकतेच या गटाला असा एक ग्रह शोधून काढण्यात यश मिळालं आहे. या ग्रहावर बर्फ असल्याचं सांगितलं जात आहे. या ग्रहाचं नाव एलएचएस 1140 बी असं आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 48 प्रकाशवर्ष दूर आहे. हा ग्रह सीटस नक्षत्रामध्ये आहे. सीटस नक्षत्राला मराठीत तिमिंगल नक्षत्र असं म्हणतात. 

कसा आहे हा ग्रह

एलएचएस 1140 बी हा ग्रह एका लालबटू ताऱ्याभोवती म्हणजेच रेड ड्रॉर्फ ताऱ्या भोवती भ्रमण करत आहे. हा तारा आकाराने आपल्या सूर्यपेक्षा एक पंचमांश लहान आहे. आपल्या सौरमालेपासून आतापर्यंत सर्वात जवळ आढळून आलेला हॅबिटेबल प्लॅनेट म्हणजेच जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते असा ग्रह आहे. अंतराळ संशोधकांच्या भाषेमध्ये ताऱ्यापासून ठराविक अंतरावर असलेल्या ग्रहांवरच संभाव्य जीवसृष्टी निर्माण होऊन ती तग धरुन राहू शकते. अशा 'गोल्डीलॉक झोन'मध्ये असलेल्या एलएचएस 1140 बी या ग्रहावरील तापमान पाणी द्रव्य स्वरुपात राहील असं आहे. त्यामुळेच इथे जीवसृष्टी निर्माण होण्यास पुरेसा वाव असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.

आतापर्यंत सापडलेला सर्वात जवळचा पृथ्वीसारखा ग्रह

"आपल्याकडे एलएचएस 1140 बी ग्रहाच्या वजनाबद्दल आणि त्याच्या भ्रमणकक्षेबद्दल पुरेशी माहिती आहे. आता या ग्रहाला वातावरण आहे का हे तपासलं पाहिजे. कारण तसं असेल तर जीवसृष्टी उदयाला येऊ शकते असा हा सापडलेला आतापर्यंतचा सर्वात जवळचा आणि सर्वात पोषक ग्रह आहे असं म्हणता येईल," अशी प्रतिक्रिया रायन क्लॉटीअर यांनी नोंदवली. रायन यांनी या संशोधनामध्ये भरीव योगदान दिलं असून ते कॅनडामधील मॉन्ट्रियल विद्यापीठातील डिपार्मेंट ऑफ फिजिक्स अँड अॅस्ट्रोनॉमी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. येथे प्राथमिक अवस्थेतील जीवसृष्टी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही असं सांगितलं जात आहे. हे खरं असेल तर पहिल्यांदाच पृथ्वीबाहेर जीवसृष्टी असलेला म्हणजेच अगदी प्राथमिक स्तरावरील जीवसृष्टीच्या माध्यमातून का असे ना पण एलियन्सचे वास्तव्य असणारा ग्रह सापडला असं म्हणता येईल. 

मागील सात वर्षांहून अधिक काळापासून सुरु आहे संशोधन

2017 मध्ये सर्वात पहिल्यांदा एलएचएस 1140 बी या ग्रहाचा शोध लागला. तेव्हापासून सर्वात पहिली शंका अशी होती की हा नवा ग्रह आपल्या सौरमालेतील नेप्यूनप्रमाणे तर नाही ना? हा ग्रह गॅसपासून तयार झालेला आणि हायड्रोजनचं वातावरण असलेला ग्रह आहे की दगडापासून तयार झालेला पृथ्वीसारखा ज्याला सुपर अर्थ म्हणतात असा ग्रह आहे? अशी शंका घेतली जात होती. या ग्रहाचं मागील अनेक वर्षांपासून मानवाने तयार केलेल्या सर्वात शक्तीशाली दुर्बिणीमधून निरिक्षण करण्यात आलं. अवकाशातील पृथ्वीचा डोळा अशी ओळख असलेल्या जेम्स वेबर स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने केलेल्या निरिक्षणामधून हा ग्रह नेप्यूनप्रमाणे पूर्णपणे वायूने बनलेला नसल्याचं स्पष्ट झालं. तसेच या निरिक्षणांमध्ये या ग्रहावरील 10 ते 20 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असू शकतो असंही स्पष्ट झालं आहे. आता या ग्रहाची जी बाजू त्याच्या ताऱ्याच्या दिशेने आहे त्याच बाजूला सर्व पाणी आहे की सर्वत्र पसरलेलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

आपण एकटे आहोत का?

या संपूर्ण विश्वात आपण एकटे आहोत का? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला आहे. मात्र जेम्स वेबससारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला आता कुठे याचा शोध घेण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. एलएचएस 1140 बी ग्रह अशाच एका संशोधनाचा भाग असून या ग्रहावर सजीव सृष्टी जगू शकते का हे शोधण्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो. मात्र या माध्यमातून पृथ्वीला जुळा भाऊ मिळण्याची शक्यता नक्कीच अधिक बळकट झाली आहे.