Stole ATM With Crane: चोरांनी एटीएम फोडून पैसे पळवण्याच्या अनेक घटनांबद्दल यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा अशा घटनांचे व्हायरल सीसीटीव्ही फुटेज पाहिले असतील. मात्र नुकताच एक विचित्र प्रकार समोर आला असून या घटनेमध्ये चोरांनी एटीएममध्ये चोरी करण्यासाठी थेट जीसीबी क्रेनचा वापर केला. हा प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. एटीएममधील केवळ पैसेच नाही तर ते एटीएम मशीनसहीत चोरण्याचा हा प्रयत्न फसला. जेसीबीच्या सहाय्याने एटीएम केंद्राचा पुढील भाग या चोरांनी पाडेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र समोर सुरु असणारा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे या चोरीसाठी वापरण्यात आलेली क्रेनही या चोरांनी एका बिल्डरच्या यार्डमधून चोरली होती.
हा संपूर्ण प्रकार ब्रिटनमधील वेस्ट ससेक्स येथे घडला. सर्वाआधी पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोनवरुन एका बिल्डरच्या यार्डामधून जेसीबी चोरीला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या चोरीचा तपास सुरु केला. त्याचवेळी अन्य एका फोन कॉलवरुन काही लोक क्रेनच्या मदतीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली. पोलिसांनी तातडीने चोरीला गेलेला जीसीबी हाच असेल या शक्यतेने या घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा चोर जेसीबीच्या मदतीने एटीएम केंद्र फोडत होते. पोलिसांना पाहून चोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या चोरांना पकडलं.
'मेट्रो' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जे एटीएम फोडण्याचा प्रयत्न या चोरांनी केला ते एटीएम एका रेल्वे स्टेशनच्या बाहेर होते. रेल्वे स्टेशनची भिंत आणि या एटीएमची मागील भिंत एकच होती. हे एटीएम पडलं असतं तर रेल्वे अपघात होऊन शेकडो लोक जखमी झाले असते किंवा मृत्यूमुखी पडले असते. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. एटीएमची एक भिंत पडली असून स्टेशनवरही भिंत पडण्याची शक्यता असल्याने रेल्वेचे अधिकारीही हादरले. त्यांनी तातडीने या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले. मात्र यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
काही काळापूर्वी महाराष्ट्रामध्येही असाच प्रयत्न काही चोरांनी केला होता. सांगलीमध्ये जेसीबीच्या मदतीने एटीमममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. जेसीबीच्या मदतीने एटीएममशीनच दुसऱ्या जागी नेण्याचा पराक्रम एका चोराने केला होता. या मशीनमधील लाखो रुपये लंपास करण्याचा या चोराचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी या चोराला अटक केली.