ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास, सिंध प्रांत, पाकिस्तान : पाकिस्तानात रविवारी भलामोठा मोर्चा निघाला. उल्लेखनीय बाब म्हणजे मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या या मोर्चेकऱ्यांनी चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक हातात धरले होते. पाकिस्तानचा सिंध प्रांत रविवारी आझादीच्या घोषणांनी दणाणून गेला. स्वतंत्र सिंधूदेश बनवण्याच्या मागणीसाठी या शेकडो आंदोलकांनी सान भागात हा भव्य मोर्चा काढला होता. यावेळी इम्रान खान सरकारच्या कारभाराचे जाहीर वाभाडे काढण्यात आले.
पाकिस्तानातील इम्रान खान सरकार सिंध प्रात चीनच्या हाती विकत असल्याची जोरदार टीका यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे या मोर्चेकऱ्यांच्या हातात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक होते. मोदी आणि जगभरातल्या अन्य नेत्यांनी सिंधूदेशाच्या निर्मितीसाठी मदत करावी, अशी आंदोलकांची मागणी होती.
सिंध प्रांतातील नेते जी. एम. सैय्यद यांनी बांगलादेशच्या निर्मितीनंतरच सिंधूदेशाची मागणी लावून धरली होती. आता सिंध प्रांतातील इतर अनेक संघटनांनीही ही मागणी उचलून धरलीय. इम्रान खान सरकार सिंध प्रांतावर जुलूम करतंय, असं या स्थानिकांचं गाऱ्हाणं आहे. इथल्या समुद्रात चीनला मासे पकडण्याची परवानगी देण्यात आल्यानं स्थानिक जनता नाराज आहे. रविवारी निघालेल्या या भव्य मोर्चात त्याच नाराजीचं जोरदार पडसाद उमटले.