Video: फ्रेंच फ्राइजवर सुकवलं लादी पुसायचं कापड! McDonald's मधला किळसवाणा प्रकार

McDonald Shocking Video: आपल्या मुलाबरोबर या आऊटलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीने हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 24, 2024, 12:31 PM IST
Video: फ्रेंच फ्राइजवर सुकवलं लादी पुसायचं कापड! McDonald's मधला किळसवाणा प्रकार title=
हा धक्कादायक प्रकार मोबाइल कॅमेरात कैद झाला आहे

McDonald Shocking Video: जगातील सर्वात प्रसिद्ध फास्टफूड फ्रेंचायझीमध्ये मॅकडोनाल्ड्सचा समावेश होतो. मात्र याच मॅखडोनाल्ड्समधील एक किळसवाणा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मॅकडोनाल्ड्सच्या आऊटलेटमधील एक धक्कादाय व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील बॉवेल या शहरातील आऊटलेटमधला आहे. येथील एक महिला कर्मचारी चक्क फ्रेंच फ्राइज गरम रहाव्यात म्हणून वापरल्या जाणाऱ्या लाईटखाली लादी पुसण्याचा मॉप (फडकं) सुकवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे, असं न्यू यॉर्क पोस्टने म्हटलं आहे. या आऊटलेटमधील एका कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ शूट केला असून तो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडीओ इतर देशांमध्येही व्हायरल झाला आहे. मात्र हा प्रकार 4 एप्रिल रोजी घडल्याचं समजतं. 

नेमकं घडलं काय?

बॉवेल येथील मॅकडोनाल्ड्समध्ये डेबी बॅरेकॅट त्याच्या मुलाला घेऊन गेल्या होत्या. त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर जे काही पाहिलं ते याहूवर शेअर केलं आहे. न्यूज ऑस्ट्रेलियाशी बोलताना डेबी यांनी, "मी आमच्या ऑर्डरची वाट पाहत होते. त्यावेळेस मी एका कर्मचाऱ्याला दुसऱ्याशी बोलताना ऐकलं. तो त्याला, मला वाटतं की तू असं करु नये कारण यामुळे आग लागू शकते,' असं म्हणताना ऐकलं. समोर पाहिलं तेव्हा एक कर्मचारी मॉपचं कापड फ्राइजपासून अवघ्या काही अंतरावर पकडून उभा होता. तो गरम लाईटखाली ते वाळवण्याचा प्रयत्न करत होता," असं सांगितलं. हा व्हिडीओ डेबी यांनी लपूनछपून शूट केला आणि शेअर केला.

समोर असं वागतात तर पाठीमागे काय करत असतील?

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. मॅकडोनाल्ड्समधील या अस्वच्छतेसंदर्भात बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त करताना व्यवस्थापनाला धारेवर धरलं आहे. डेबीने पुढे बोलताना, "मी फ्राइज घ्यायला गेले तेव्हा काय करावं हे कळलं नाही. मी जे पाहिलं त्यामुळे मला धक्का बसला होता. मात्र ती कर्मचारी हसून निघून गेली," असंही सांगितलं. "या अशा आऊटलेटविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. ते ग्राहकांसमोर हे असं वागू शकतात तर पाठीमागे काय काय करत असतील?" असा सवाल एकाने उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ डेबी यांनी स्टोअर मॅनेजरला मेल केला असता समोरुन आम्ही या प्रकरणी कठोर कारवाई करु आणि असं पुन्हा होणार नाही, असं आश्वासन देणारं उत्तर आलं आहे.

कर्मचाऱ्याला कमावरुन काढणार नाही

मॅकडोनाल्ड्स ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी ही फार दुर्मिळ घटना असल्याचं सांगितलं आहे. मॅकडोनाल्ड्समध्ये स्वच्छतेसंदर्भात सर्व काळजी घेतली जाते. आमचे अन्नपदार्थ हे सुरक्षित असून आम्ही फार गांभीर्याने याबद्दलची काळजी घेतो, असं मॅकडोनाल्ड्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकण्यात येणार नाही असं मॅकडोनाल्ड्सने स्पष्ट केलं आहे. या कर्मचाऱ्याला अधिक योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिलं जाईल ज्यामुळे भविष्यात असा प्रकार घडणार नाही असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.