नेपाळचं पुन्हा भारताविरोधात पाऊल, भारतीय न्यूज चॅनलच्या प्रसारणावर बंदी

नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने पुन्हा एकदा भारताविरोधात पाऊल टाकलं आहे.

Updated: Jul 9, 2020, 11:05 PM IST
नेपाळचं पुन्हा भारताविरोधात पाऊल, भारतीय न्यूज चॅनलच्या प्रसारणावर बंदी

नवी दिल्ली : नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने पुन्हा एकदा भारताविरोधात पाऊल टाकलं आहे. नकाशाच्या वादावरून आधीच भारत आणि नेपाळ यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत. यातच आता ओली सरकार भारतीय मीडियावर नाराज झालं आहे. यामुळे भारतीय न्यूज चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. 

नेपाळमध्ये सध्या चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. भारताविरोधातल्या मुद्द्यावरून ओली सरकारच्या कम्युनिस्ट पक्षातच मतभेद आहेत. हे मतभेद सोडवण्यासाठी चीनचे राजदूत हस्तक्षेप करत आहेत. भारतीय मीडियाच्या या भूमिकेबाबत ओली सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. 

नेपाळ सरकारचे प्रवक्ते युवराज खतिवाडा यांनी पत्रकार परिषदेत भारतीय न्यूज चॅनलनी चीनच्या राजदूतांबद्दल दाखवलेल्या बातम्यांबाबत आक्षेप घेतले होते आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यानंतर नेपळामध्ये भारतीय खासगी न्यूज चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली. पण दुसरीकडे नेपाळमध्ये पाकिस्तानी आणि चीनी चॅनलचं प्रक्षेपण सुरू राहणार आहे. 

दुसरीकडे नेपाळी केब टीव्ही ऑपरेटरनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भारतीय न्यूज चॅनलचं प्रसारण बंद करण्यात आलं असलं, तरी याबाबत सरकारचा कोणताही आदेश आलेला नाही, असं सांगितलं आहे.