वॉशिंग्टन : अमेरिकेने व्हिजाच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. हे F1 व्हिजाबाबतचे हे नवे नियम विद्यार्थ्यांसाठी अनिश्चितता आणि अडचणी निर्माण करतील, अशी भीती अमेरिकेतल्या भारतीय दुतावासाने व्यक्त केली आहे. F1 व्हिजाबाबतच्या नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना कमीतकमी एक अभ्यासक्रम वैयक्तिकरित्या वर्गात उपस्थित राहून पूर्ण करावा लागणार आहे, अन्यथा या विद्यार्थ्यांना निर्वासित व्हायचा धोका आहे.
'अमेरिकेतल्या विद्यापीठांनी आणि कॉलेजनी नव्या शैक्षणिक वर्षाबाबतच्या योजनांची घोषणा केलेली नाही. या नव्या नियमांमुळे अमेरिकेत आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर अनिश्चितता आणि अडचणी निर्माण होतील,' अशी प्रतिक्रिया भारतीय दुतावासाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
भारत सरकारने याबाबत अमेरिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उचलला आहे. ७ जुलैला परराष्ट्र सचिन हर्षवर्धन श्रृंगला यांनी याबाबत अमेरिकेशी बोलताना चिंता व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार या वर्षाच्या जानेवारीमध्ये अमेरिकेतल्या वेगेवगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये १,९४,५५६ भारतीय विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये १,२६,१३२ पुरुष आणि ६८,४०५ महिलांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिका व्हिजाबाबतच्या नियमांमध्ये नरमाईची भूमिका घेईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.