एक बेट मृत्यूचं; 'या' बेटावर माणसांना बंदी

बेटावर राहत नाही एकही माणूस...

Updated: Nov 6, 2019, 11:58 PM IST
एक बेट मृत्यूचं; 'या' बेटावर माणसांना बंदी title=
संग्रहित फोटो

रोम : विज्ञानवादी जगात भुतंखेतं मानणारा मोठा वर्ग आहे. भुतांच्या भीतीमुळे इटलीतल्या एका बेटावर दिवसाही माणसं जात नाही. किंबहुना तिथल्या सरकारनंही लोकांना या बेटावर जाण्यास बंदी केली आहे.

माणूस मंगळावर पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना जगातलं एक ठिकाण असं आहे की जिथं माणसांना रात्री काय दिवसाही जायची बंदी आहे. इटलीतल्या व्हेनेसिया सरोवरात असलेल्या पोवेग्लिया बेटावर माणसांना जायला बंदी आहे. हे बेट मृत आत्म्यांनी भारलेलं आहे अशी समजूत आहे. त्यामुळं या बेटावर कोणीही जायला धजावत नाही. 

पोवेग्लिया बेटावर पूर्वी मच्छीमारांचा वावर होता. अठराव्या शतकात या बेटावर प्लेगच्या रुग्णांना मरण्यासाठी सोडलं जायचं. लोकांच्या आक्रोशाच्या किंकाळ्या आजही इथं ऐकू येत असल्याचं सांगण्यात येतंय. प्लेगनं मृत्यू झालेल्या लोकांना याच बेटावर दफन केलं जायचं. एका वेळी तर या बेटावर एक लाख साठ हजार लोकांना जिवंत जाळण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 

या बेटावर १९२२ च्या काळात एक हॉस्पिटल बांधण्यात आलं. पण हे हॉस्पिटल खूप वेळ चाललं नाही. तिथले सगळे कर्मचारी भयावह अनुभवांमुळे पळून गेले. निर्मनुष्य असलेल्या या बेटावरच्या हॉस्पिटलची नंतरच्या काळात डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी बांधलेली परांचीही तशीच ठेऊन पळ काढला. 

  

आजही या बेटाची दहशत परिसरातल्या लोकांवर आहे. या बेटावर गेलेला माणूस परत येत नाही अशी धारणा तिथल्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे या भुताच्या बेटावर माणसांना दिवसाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.