Why this man not slept since 1962: झोप आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. शरीर आरोग्यदायी आणि सुदृढ राखायचं असेल तर पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची असते. उत्तम झोप (Sleep) ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं मानलं जातं. सलग दोन-तीन दिवस जागरण झाल्याने तब्येतीवर त्याचा गंभीर परिणा होतो. त्यामुळे प्रत्येकाला झोप ही गरजेचीच आहे. पण यालाही काही अपवाद आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जगात असा एक व्यक्ती आहे जो एक-दोन दिवस नाही तर चक्क गेली 61 वर्ष झोपलेलाच नाही.
ताप आला आणि झोप गेली
व्हिएतनामध्ये (Vietnam) राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे थाई एनजोक (Thai Ngoc). 80 वर्षांचे एनजोक सांगतात लहानपणी त्यांना एके रात्री अचानक ताप आला आणि त्या रात्रीनंतर ते कधीच झोपू शकले नाहीत. जगातील कदाचिक हे पहिलंच असं प्रकरण आहे. आपणही सुखाची झोप घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे, पण काही केल्या त्यांना झोपच येत नाही.
एनजोक यांना काय झालेलं?
साधारण 1962 मध्ये त्यांच्या डोळ्यावरची झोप कायमची गेली. गेल्या अनेक वर्षात त्यांची पत्नी, मुलांनी किंवा मित्र, शेजाऱ्यांनी कुणीच त्यांना झोपताना पाहिलेलं नाही. एनजोक झोपतात कि नाही हे पाहण्यासाठी अनेकांनी त्यांची परीक्षा घेतली, पण ते अपयशी ठरले. डॉक्टरांनी एनजोक यांना इनसोम्निया (Insomnia) म्हणजे निद्रानाश झाल्याचं सांगितलं. ज्यामुळे पीडित मनुष्याच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. पण एनजोक पूर्णपणे तंदरुस्त आहेत.
एनजोक सकाळी अनेक तास चालतात आणि अंगमेहनत करतात. त्यांना डाएट फूड आवडतं. याशिवाय ते ग्रीन टी आणि वाईनचे शौकिन आहेत. त्यांचं कुटुंबही आनंदी परिपूर्ण आहे. पण एनजोक यांना एकाच गोष्टीची खंत आहे ती म्हणजे त्यांना झोप येत नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं इतरांपेक्षा खूप अंगमेहनत केली तरी त्यांना थकवा जाणवत नाही.