नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन शेजारी युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. तालिबान आणि पाकिस्तानी आर्मी एकमेकांवर सातत्याने गोळीबार करत आहेत. तालिबानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी एअरफोर्सने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ४० हून अधिक अफगाणी नागरिक ठार झालेत. आता हा मुद्दा घेऊन तालिबानने थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये धाव घेतली आहे.
एकेकाळी तालिबानला पोसणा-या पाकिस्तानला आता तालिबानने दात दाखवले आहेत. तालिबान आणि पाकिस्तानी आर्मी यांच्यातला संघर्ष टोकाला गेला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान थेट युद्ध कऱण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक केले आहेत. हे हवाई हल्ले नागरी वस्त्यांवर करण्यात आले. त्यात ४० हून अधिक सर्वसामान्यांना बळी पाकिस्तानने घेतलाय. मृतांमध्ये सर्वाधिक समावेश हा महिला आणि लहान मुलांचा आहे.
उत्तर वाजिरीस्तान भागात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर हा संघर्ष पेटला. अफगाणिस्तानातून काही तालिबानी टोळ्यांनी पाकिस्तानी पोस्टवर जोरदार गोळीबार केला. त्यात पाकिस्तानच्या 8 सैनिकांचा बळी गेला. हल्ल्यामागे तहरिक ए तालिबान पाकिस्तान या गटाचा हात असावा असा पाकिस्तानला संशय आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या 4 गावांवर जोरदार मारा केला. या बॉम्बफेकीत अनेक सामान्यांचा बळी गेला.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये तब्बल 1600 किलोमीटर लांबीची सीमा आहे. या सीमेवर अनेक दहशतवादी गट सक्रीय आहेत. हे दहशतवादी गट पाकिस्तानची डोकेदुखी झाले आहेत. त्यांचा बिमोड करण्यासाठी पाकिस्तानी आर्मीने जोरदार कारवाया सुरू केल्या आहेत. 16 एप्रिलपासूनच या भागात पाकिस्तानने एअरस्ट्राईक केल्य़ाचं सांगितलं जातं.
पाकिस्तानच्या या हल्ल्यांविरोधात आता अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रात धाव घेतलीय. अफगाणिस्तानच्या खोश्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले झाल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला.
पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातली ड्युरंड लाईन ही सीमा अफगाणिस्तानला मान्य नाही. पाकिस्तानने या ड्युरंड लाईननुसार सीमेवर तटबंदी घालण्याचं काम सुरू केलंय. अफगाणिस्तानचा त्याला विरोध आहे. त्याचमुळे तालिबानी टोळ्या वारंवार पाकिस्तान आर्मीवर हल्लाबोल करत आहेत. ज्या तालिबानला एकेकाळी पाकिस्तानने पोसलं, जो दहशतवाद पाकिस्तानने जन्माला घालून जगाला छळलं तोच दहशतवादाचा भस्मासूर आता पाकिस्तानवर उलटला आहे.