पंजशीरमध्ये युद्ध सुरूच, 700 तालिबान्यांचा खात्मा, नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचा दावा

अफगणिस्तानात (Afganistan) सत्तेचे गणित मांडणाऱ्या तालीबानींना पंजशीर (Panjshir) प्रांतात जोरदार विरोधाला सामोरं जावं लागतंय.  

Updated: Sep 5, 2021, 10:56 PM IST
पंजशीरमध्ये युद्ध सुरूच, 700 तालिबान्यांचा खात्मा, नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचा दावा   title=

काबूल : पंजशीरसाठी (Panjshir) जोरदार लढाई सुरू आहे. 700 तालिबानी (Talibani) ठार मारल्याचा दावा नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटने (national resistance front) केलाय. 600 दहशतवादी पकडले गेल्याचाही दावा करण्यात येतोय. दुसरीकडे तालिबानीही आपल्या विजयावर ठाम आहेत. (Panjshir Resistance Force claims that around 700 Taliban were killed and 600 others imprisoned in Saturday fighting) 

अफगणिस्तानात सत्तेचे गणित मांडणाऱ्या तालीबानींना पंजशीर प्रांतात जोरदार विरोधाला सामोरं जावं लागतंय. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटनं तालिबानी दहशतवाद्यांना कपिसा आणि पंजशीरच्या सीमेवर परत ढकलल्याचा दावा केलाय. पंजशीरमध्ये तालिबानच्या 700 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. 

तर 600 जणांना कैद केल्याचा दावाही करण्यात येतोय. दुसरीकडे तालिबानी मात्र विजयाच्या दाव्यावर ठाम आहेत. पंजशीर प्रांताची राजधानी बझारकमध्ये घुसल्याचा दावा करत तालिबान्यांनी प्रांतीय गव्हर्नर कार्यालयावर हल्लाही केला. खिंज आणि उनाबाह जिल्ह्यांसह चार जिल्हे आपल्या ताब्यात आल्याचं तालिबानी प्रवक्ते सांगतायेत. 

पंजशीर हा नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचा बालेकिल्ला मानला जातो. ज्याचं नेतृत्व अहमद शाह मसूद यांचे पुत्र आणि माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्याकडे आहे. अशरफ गनी देश सोडून पळून गेल्यानंतर त्यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केलं होतं. खवाक पासमध्ये हजारो दहशतवाद्यांना वेढलं असून आणि तालिबान्यांनी आपली वाहनं आणि उपकरणं तिथंच सोडल्याचं नॅशनल रेझिस्टन्सनं म्हणणं आहे.  याचाच अर्थ पंजशीरची लढाई अद्याप संपलेली नाही.