ह्युस्टन, अमेरिका : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ह्युस्टन शहरात 'हाऊडी मोदी' हा मेगा शो पार पडला. यावेळी एनआरजी (NRG) स्टेडिअममध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जवळपास ५० हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७०चा दहशतवाद्यांकडून चुकीचा वापर करण्यात आला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केले. अनुच्छेद ३७०चा उल्लेख करत भारतासमोर गेल्या ७० वर्षांपासून मोठे आव्हान होते, ज्याला देशाने काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आणल्याचे मोदी म्हणाले.
दहशतवादाविरोधात निर्णायक लढाईची वेळ आली असल्याचे वक्तव्य करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला आहे.
या कार्यक्रमाचे नाव Howdy Modi आहे. परंतु मोदी ऐकटे काही नाही आहेत. मी सव्वा कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा साधारण व्यक्ती आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही विचारले #HowdyModi त्याचे उत्तर, भारतात सर्व काही चांगले सुरु आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
भारताचा खरा मित्र व्हाईट हाऊसमध्ये आहे आणि तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प असे मोदी भाषणादरम्यान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा किस्सा सांगत, पहिल्या भेटीत कुटुंबीयांशी ओळख करून दिल्याचा उल्लेख केला. त्यानंतर प्रेक्षकांकडे हात दाखवत हे पाहा माझे कुटुंब असेही ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करुन दाखवले. त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटत असल्यांमुळे मी कायम म्हणत असतो, अबकी बार ट्रम्प सरकार असे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यासपीठावरून नारा दिला.
इंटरनेट डेटा हेचं नवे सोने असून, जगात सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा भारतात उपलब्ध आहे असे सांगत मोदींनी भारतातील इंटरनेटच्या क्रांतीबद्दल माहिती दिली.