Russia Ukraine War : रशियन सैन्याने आता युक्रेनमधील प्रशासकीय आणि निवासी इमारतींवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये विध्वंस केला आहे. रशियाकडून आता युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर खारकीव्हवर हल्ला केला जात आहे.
या विध्वंसक हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रशियन क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात युक्रेनमधल्या खारकिव्ह शहरातील एक प्रशासकीय इमारत अवघ्या दोन सेकंदात कोसळली.
मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता हा हल्ला झाला. खारकिव्ह मधल्या या उद्धव्स्त झालेल्या इमारतीत प्रादेशिक प्रशासकीय कार्यालयं आहेत. यात प्रचंड मानवी हानी झाल्याची शक्यता आहे. प्रशासकीय आणि निवासी इमारतींवर हल्ले करणं हे युद्धाच्या नियमांचं उल्लंघन मानलं जातं.
खारकिव्हचे प्रमुख ओलेग सेंगुबोव्ह यांनीही प्रशासकीय इमारत कोसळल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे . रशियन हल्ल्याचा आज सहावा दिवस असून आता प्रशासकीय आणि निवासी इमारतींवरही रशियाकडून हल्ले होत असल्याची माहिती त्यांनी दिली. सेंगुबोव्ह म्हणाले की, रशियाने खारकिव्हवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पण आपलं सैन्य हिमतीने उभं आहे आणि रशियाशी जोरदार मुकाबला केला जात आहे. खारकिव्ह व्यतिरिक्त रशियन सैन्याने राजधानी कीवलाही वेढा घातला आहे.
p>
कीव्हमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन
कीवमध्ये सतत हवाई हल्ल्यांचे सायरन सतत वाजत असतात. संपूर्ण शहर जवळपास रिकामे आहे. महिला, मुले आणि वृद्ध निघून गेले आहेत, तर मोठ्या संख्येने तरुण लोक रशियन सैन्याशी दोन हात करण्यासाठी राहिले आहेत. रशियाचा 64 किमी लांब इतका लष्करी ताफा कीवच्या दिशेने पुढे जात आहे. हा ताफा कीवपासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत कीववर कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो.