बाळाला वाचवण्यासाठी आईने लावली जीवाची बाजी, लोकांनी म्हटलं 'सुपरवुमन'

आईने स्वतःचा जीव घातला धोक्यात पण...

Updated: Sep 23, 2021, 06:49 AM IST
बाळाला वाचवण्यासाठी आईने लावली जीवाची बाजी, लोकांनी म्हटलं 'सुपरवुमन' title=

मुंबई : सोशल मी़डियावर अनेक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ आपलं मन जिंकतात तर काही व्हिडीओ आपले चांगलेच डोळे उघडतात. असाच एक व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आईने चक्क आपल्या पोटच्या मुलाला यमाच्या दारातून खेचून आणलं आहे. 

हा व्हिडीओ नक्की कुठचा आहे. हे कळलं नाही. मात्र या व्हिडीओतील आई सुपरहिरो ठरली आहे. सोशल मी़डियावर या आईची जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या मुलाचा जीव वाचवण्याच्यासाठी तिने उचलले पाऊल हे नक्कीच कौतुकास्पद आहे. 

ट्विटरवर व्हायरल होतोय व्हिडीओ 

आई कायमच आपल्या बाळाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवते. बाळाच्या रक्षणाकरता ती कोणतंही पाऊल उचलू शकते. ट्विटरवरील हा व्हिडीओ भारतीय वन अधिकारी सुशांता नंदाने 21 सप्टेंबर रोजी शेअर केलाय. या व्हिडीओला कॅप्शन दिली आहे की, या जगाला आईची गरज आहे. 

स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला मुलाचा जीव

16 सेकंदांच्या या छोट्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक महिला लहान मुलासह भिंतीजवळ बसलेली दिसते. अचानक त्या स्त्रीला असे वाटते की काहीतरी चुकीचे घडणार आहे. एका क्षणात भिंत कोसळू लागते आणि ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी भिंत कोसळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. पण भिंत कोसळली आणि सर्व विटा त्या महिलेच्या पाठीवरून गेल्या आणि जमिनीवर विखुरल्या. पण या अपघाताच्या वेळी ती आपल्या मुलाला ओरखडाही घेऊ देत नाही. लवकरच दुसरी व्यक्ती तिथे येते आणि मुलाला त्या विटांच्या ब्लॉकमधून बाहेर काढते. यानंतर ती महिला देखील विटातून बाहेर येते आणि ते तिथून निघून जातात.