मुंबई : जगात अशी अनेक बेटं आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती असेल. तुम्ही जगातील अनेक सुंदर बेटांबद्दल ऐकलं असेल. पण असंच एक बेट आहे, ज्याच्या नावावर जगातील सर्वात लहान बेटाचा विक्रम आहे. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे की, जगातील या सर्वात लहान बेटावर फक्त एका घराशिवाय एकच झाड दिसतं.
न्यूयॉर्कच्या अलेक्झांड्रिया खाडीजवळ एक छोटेसं बेट आहे. हे जगातील सर्वात लहान बेट मानलं जाते. 'जस्ट रूम इनफ' असं या बेटाचं नाव आहे. या बेटाचा आकार टेनिस कोर्टएवढा आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे या बेटावर एकच घर आणि एकच झाड आहे.
'जस्ट रूम इनफ' हे बेट इतकं लहान आहे की ते घराच्या एका कोपऱ्यातून सुरू होतं आणि त्याच घराच्या दुसऱ्या कोपऱ्यात संपतं. संपूर्ण जगात 2000 पेक्षा जास्त बेटं आहेत आणि हे बेट देखील त्यापैकी एक आहे. या बेटाचा आकार केवळ 3,300 चौरस फूट आहे. त्याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे.
या बेटाच्या आधी 'बिशप रॉक' हे जगातील सर्वात लहान बेट मानलं जात होतं. पण जस्ट रूम इनफ आयलंड आता जगातील सर्वात लहान बेट बनलं आहे.
'जस्ट रूम इनफ' बेट हे बिशप बेटाच्या निम्म्याएवढं आहे. पूर्वी हे बेट 'हब आयलंड' म्हणून ओळखलं जात होतं, परंतु 1950 मध्ये हे बेट एका कुटुंबाने विकत घेतलं. त्यानंतर कुटुंबीयांनी याठिकाणी छोटेसं घर बनवून वृक्षारोपण केलं. काही काळानंतर त्यांनी या बेटाचे नाव बदलून 'जस्ट रूम इनफ' असंही ठेवलं.