India China Border Clash : चीननं (China) पुन्हा एकदा भारतावर (India) कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सीमेवर (Tawang Border) भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. तब्बल ३०० हून अधिक चिनी सैनिक चाल करून आले होते. मात्र भारतीय जवानांनी चीनी सैन्याला तोडीस तोड देत त्यांच्यावर जबरदस्त पलटवार केला. सीमेवर तणाव स्थिती असताना चीन भारताविरोधात भयानक षडयंत्र रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनकडून भारतावर सायबर हल्ला(cyber attack) होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
चीन फक्त सीमेवर नाही तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतोय, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय कर्मचा-यांसाठी खबदराीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
कॉम्प्युटरचा वापर, ईमेलचा वापर आणि सॉफ्टवेअर अपडेट यासंबंधी कर्मचा-यांसाठी काही सूचना जारी देण्यात आल्या आहेत. पॉवर ग्रिड, बँकिंग सेक्टरला चीनी हॅकर्स टार्गेट करु शकतात. त्यादृष्टीनं सायबर सुरक्षेसंबंधी अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्सचा सर्व्हर हॅक करण्यात आला होता. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेशी काळजी न घेतल्यानं हा हल्ला झाला असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अरुणाचलच्या तवांग सीमेवर 2006 पासून झटापटी सुरू आहेत. ऑक्टोबर 2021 मध्येही भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यांगसे भागात चिनी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांना काही तास ताब्यात घेतलं होतं. तर 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खो-यातही दोन्ही देशांच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी भारताचे सुमारे 20 जवान शहीद झाले होते. तर केवळ 5 चिनी सैनिक ठार झाल्याचा दावा चीननं केला होता. 2017 साली देखील डोकलाममध्ये दोन्ही सैन्यामध्ये तब्बल 73 दिवस धुमश्चक्री सुरू होती.
लडाख असो नाहीतर अरुणाचल प्रदेश, भारताची कुरापत काढण्याची एकही संधी चिनी ड्रॅगन सोडत नाही. मात्र चिनी ड्रॅगनचं वळवळणारं शेपूट ठेचून काढण्याची क्षमता भारतीय सैनिकांमध्ये आहे आणि प्रत्येक हल्ल्यात भारतीय जवानांनी ते सिद्ध करून दाखवलंय.