कोरोनावर मात करण्यासाठी 'रोल्स रॉयस', 'फोर्ड'ची अशी होणार मदत

प्रशासनाने मागितला मदतीचा हात   

Updated: Mar 17, 2020, 02:07 PM IST
कोरोनावर मात करण्यासाठी 'रोल्स रॉयस', 'फोर्ड'ची अशी होणार मदत
छाया सौजन्य- सोशल मीडिया

लंडन : जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता कहर साऱ्यांनाच चिंतेत टाकत आहे. जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये कोवि़ड १९ या आजाराचा अर्थात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. परिणामी या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकांनीच प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. युद्धपातळीवर कोरोनाशी लढा दिला जात असून, प्रत्येक देशातील प्रशासनही तितक्याच प्रभावीपणे कामाला लागलं आहे. 

युकेमध्येसुद्धा कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. आतापर्यंत या ठिकाणी जवळपास १५००जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर जवळपास ५५ जणांचा कोरोनाच्या विळख्यात मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही एकंदर भीतीदायक लाट पाहता मोठमोठ्या इंजिन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडे आता प्रशासन मदत मागू लागल्याचं कळत आहे. 

'फोर्ड', 'होंडा', 'रोल्स रॉयस' या कंपन्यांकडून कोरोनावर मात करण्यासाठीच्या मदत करणाऱ्या उपकरणांची निर्मिती करण्यास मदत मागितली जाऊ शकते. 'रॉयटर्स'कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार लोकप्रिय ब्रिटीश ऑटोमोटीव्ह कंपनी 'रोल्स रॉयस' कंपनीकडे मदतीसाठीची विचारणा करण्यात आली आहे. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

'होंडा' कारची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडेही गरज भासल्यास व्हेंटिलेटरची निर्मिती करण्याचं काम सोपवलं आहे. श्वसनप्रक्रियेत अडचणी येत असल्यास आणि परिस्थिती अधिक तणावाची झाल्यास व्हेंटिलेटर्सची गरज लागू शकते, त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात येणार आहे.  

युके सरकारकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल पाहता येत्या काळात या कंपन्या पूर्ण क्षमतेने किंवा किमान शक्य तितक्या स्तरावर कोरोनाशी लढण्यासाठीच्या मदत कार्यात हातभार लावू शकतात.