कोरोना व्हायरस : वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसीत केली रोगप्रतिकारशक्ती

तरुण रुग्णांची प्रतिकार शक्ती अधिक असल्यानं कोरोना व्हायरसचा प्रतिकार ते सहज करतात.  

Updated: Mar 17, 2020, 12:13 PM IST
कोरोना व्हायरस : वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसीत केली रोगप्रतिकारशक्ती title=

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एखाद्या संक्रमीत व्यक्तीसोबत संपर्क आल्यानंतर या विषाणूचा फैलाव होत आहे. शिवाय ज्या रूग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना या धोकादायक विषाणूची लागण जास्त प्रमाणात होवू शकते. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सर्वच देश कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगातून माकडांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याचं उघड झालं आहे. याचाअर्थ माकडांच्या शरीराच्या माध्यमातून एँन्टीबॉडी घेऊन नवीन लस विकसीत केल्या जाऊ शकतात. 

चीनचे वैज्ञानिक आता माकडांमधील एँन्टीबॉडीज घेवून महिन्याभरात त्याचा माणसांवर प्रयोग करणार आहे. एँटीबॉडी हे आपल्या शरीरीतील व्हायरसशी लढत असतात. कोणत्याही आजाराशी लढून ते आपला बचाव करत असतात. 

चीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील १लाख ७० हजार ७४० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात आज कोरोनामुळे पहिला बळी गेला. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. 

दुबईतून आलेला हा रुग्ण ६४ वर्षांचा वृद्ध होता. तरुण रुग्णांची प्रतिकार शक्ती अधिक असल्यानं कोरोना व्हायरसचा प्रतिकार ते सहज करतात. तरुणांप्रमाणे प्रतिकार शक्ती वृद्ध रुग्णांमध्ये नसते, त्यामुळे कोरोनाग्रस्त वृद्ध रुग्णांची अधिक काळजी घ्यावी लागते. 

हिंदुजा रुग्णालयात या रुग्णाला कोरोना व्हायरस झाल्याचं लक्षात आल्यानंतर उपचारादरम्यान या रुग्णाच्या सहवासात आलेल्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी अशा सुमारे १०० जणांची कोरोना चाचणी करून त्यांना वेगळं ठेवण्यात आलं आहे.