मुंबई : फ्रान्समध्ये लॉकडाऊन, जर्मनीत कडक निर्बंध आणि आता युकेमध्ये फॉरेन ट्रीपला बंदी. कोरोनाच्या लाटेमुळे युरोपीय देशांना कठोरातले कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. २९ मार्चपासून ब्रिटनमध्ये कोरोनासंबंधी नवे नियम लागू होत आहेत.
काय आहेत नियम?
२९ मार्चनंतर ब्रिटनमधून कुणीही विनाकारण देशाबाहेर जाऊ शकत नाही. फॉरेन ट्रीप करण्यासाठी तुमच्याकडे ठोस कारण असायला हवं. हा नियम मोडल्यास तब्बल ५ हजार पाऊंड म्हणजेच ५ लाख रूपयांचा दंड होऊ शकतो. लॉकडाऊनमधून आता बाहेर पडणाऱ्या ब्रिटनने काही नवे नियम लागू केले आहेत.
जर तुमच्याकडे युकेबाहेर जाण्यासाठी काही ठोस कारण असेल, आणि तुम्ही प्रवास करणार असाल, तर त्यावेळी भरण्यात येणाऱ्या कागदपत्रात तुम्ही चुकीची माहिती भरली, तर तुम्हाला २०० पाऊंडचा दंड भरावा लागेल.
या नव्या कायद्यात कामानिमित्त किंवा शिक्षणाकरिता कुणी ब्रिटनबाहेर जाऊ इच्छित असेल, तर त्यांना सूट देण्यात आली आहे. याशिवाय कॉमन ट्रॅवल एरिया किंवा आयरलँडमध्ये जायचं असेल, तरीही तुम्हाला त्याची परवानगी देण्यात येईल.
२९ मार्चपासून लागू होणाऱ्या या निर्णयाचे परिणाम कसे होतात हे १२ एप्रिलला पाहिलं जाईल, आणि त्यानंतरही प्रत्येकी ३५ दिवसांनंतर निरीक्षण केले जाईल.
या देशांमध्ये प्रवासावरही येऊ शकते ताप्तुरती बंदी
ज्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशा देशांमध्ये प्रवासावरही निर्बंध येऊ शकतात. फ्रान्सला रेड लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. दक्षिण आफ्रीकेत मिळणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे तिथेही जाण्याबाबत काही अटी-शर्थी लागू होऊ शकतात.