भारताविरोधात पाकिस्तानचे कारस्थान उघड, असा रचला जात होता कट

 भारताविरूद्ध मोठे कारस्थान रचण्यात गुंतल्याचे उघड

Updated: Mar 23, 2021, 03:01 PM IST
भारताविरोधात पाकिस्तानचे कारस्थान उघड, असा रचला जात होता कट title=

नवी दिल्ली : एकीकडे जगाच्या नजरेत धूळ घालण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) भारताशी शांतता चर्चा करण्याचे नाटक करीत आहे तर दुसरीकडे भारताविरूद्ध मोठी षडयंत्र रचण्यात गुंतल्याचे उघड झालंय. झी मीडियाकडे असलेल्या Exclusive कागदपत्रांनुसार, पाकिस्तानने 5 फेब्रुवारी रोजी काश्मिर एकता दिनाच्या (Kashmir Solidarity Day) नावाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करण्यासाठी जगभरात व्यापक मोहीम राबविली होती. त्याअंतर्गत देशातील पाकिस्तानी दूतावासामार्फत भारताविरूद्ध भव्य निदर्शने आयोजित करण्याची योजना आखण्यात आली.

इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या आयएसआयने आपल्या सर्व दूतावासांना फॅक्स आणि ईमेलद्वारे यासंदर्भात माहिती दिली. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा दलांविरूद्ध खोटी मानवाधिकार उल्लंघनाची प्रकरणे कशी उघड करावीत हे यात सांगितले होते. 

पाकिस्तानने हा कट प्रत्यक्षात आणण्यासाठी कोट्यावधी डॉलर्स खर्च केले होते. यावर्षी 2 ते 28 जानेवारी दरम्यान पाकिस्तानने आपल्या सर्व दूतावासांना ईमेल आणि फॅक्सच्या माध्यमातून माहिती दिल्याचे झी मीडियाला मिळालेल्या कागदपत्रांमधून स्पष्ट झाले आहे. 

या नियोजनानुसार अमेरिका, ब्रिटन, जपान, कोरिया, कॅनडा, जर्मनी, आफ्रिकन देशांमध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासांना त्या देशांमधील पाकिस्तानी वंशाच्या लोकांच्या मदतीने भारतीय दूतावासांसमोर निषेध करण्यास सांगण्यात आले.

काश्मीरवरील वेबिनार आणि कार्यक्रम सर्व देशांमध्ये आयोजित केले पाहिजेत. तसेच भारतीय सुरक्षा दलांविरूद्ध बनावट मानवाधिकार उल्लंघन केल्याच्या घटनांवर प्रकाश टाकला जाण्याची योजनाही आखण्यात आली होती. सर्व आंदोलनांना त्या देशांच्या माध्यमांमध्ये चांगल्या कव्हरेजसाठी योजना तयार करण्यास सांगण्यात आले. इस्लामाबादमधील सर्व पाकिस्तानी दूतावासांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निधीही पाठविला गेला.

अमेरिकेत भारताविरूद्ध कट

1 फेब्रुवारी रोजी, पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील त्याच्या वाणिज्य दूतावास जनरल कार्यालयात (Consulate General Office) अशाच आशयाचे फॅक्स पाठवले होते. ज्यात पाकिस्तानी, अमेरिकन समुदायाच्या मदतीने कॅंडल विजिल प्रोटेस्ट (Candle Vigil Protest) करुन काश्मीर एकता दिन यशस्वी करण्यास सांगण्यात आले होते. तसेच न्यूयॉर्कच्या सर्व टॅक्सी आणि ट्रकवर जाहीरात कॅम्पेन (Advertisement Campaign)चालवण्यास सांगितले गेले.

चीनमध्ये भारताविरूद्ध षडयंत्र

Kashmir Solidarity Day च्या नावाखाली चीनने भारताला बदनाम करण्यासासाठी पाकिस्तानने कोणतीही कसर सोडली नाही. चीनच्या चेंगदू येथील पाकिस्तानी वाणिज्य दूतावास कार्यालयाला इस्लामाबादहून पाठविलेल्या फॅक्समध्ये असे म्हटले होते की, भारताला बदनाम करण्यासाठी चिनी सोशल मीडिया Appचा वापर केला जावा. तसेच, कॉन्सिलेट कार्यालयात काश्मीरवर आधारित कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. ज्यामध्ये किमान 100 लोकांना आमंत्रित केले जावे. इस्लामाबादनेही यासाठी 80,400 रुपयांचे बजेट जाहीर केले होते.