'हमास कारण नसताना...'; संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी इस्रायललाच सुनावलं! नवीन वादाला फुटलं तोंड

UN Chief Antonio Guterres Comment On Hamas: 7 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी हमासची बाजू घेत इस्रायलवरच टीका केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 25, 2023, 08:19 AM IST
'हमास कारण नसताना...'; संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी इस्रायललाच सुनावलं! नवीन वादाला फुटलं तोंड title=
इस्रायलने या भूमिकेवर आक्षेप घेत थेट संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

UN Chief Antonio Guterres Comment On Hamas: संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अ‍ॅन्टोनियो गुटेरस यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा उल्लेख केला. हमासने इस्रायलवर कारण नसताना हल्ला केलेला नाही, असं गुटेरस म्हणाले आहेत. मात्र गुटारेस यांच्या या विधानाने इस्रायल नाराज झाला असून संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी राजीनामा द्यावा आणि माफी मागणी अशी मागणी केली आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन सुरक्षा परिषदेच्या मंत्री स्तरावरील बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य कार्यालयामध्ये गुटेरस यांची भेट घेणं अपेक्षित होतं. मात्र कोहेन यांनीच ही भेट टाळली.

गुटेरस काय म्हणाले?

कोहेन यांनीच स्वत:हून गुटेरस यांच्याबरोबरची नियोजित बैठक रद्द केली. कोहने यांनी गुटेरस यांच्यावर 'दहशतवाद सहन करणे आणि तो योग्य असल्याचा दावा करणे' असा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख गुटेरस यांनी, 'हमासकडून करण्यात आलेले हल्ले अकारण नाहीत हे सुद्धा आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पॅलेस्टाईनमधील लोकांना मागील 56 वर्षांपासून श्वास गुदमरल्याप्रमाणे ताबा मिळवलेल्या प्रांतात राहवं लागत आहे,' असंही म्हटलं.

पॅलेस्टाईनवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याच समर्थन करता येणार नाही

गुटेरस यांनी, "त्यांनी आपली जमीन कायम (यहूदी) लोकांकडून हडप करण्याचा त्रास सहन केला आहे. तसेच त्यांना कायम हिंसेला सामोरं जावं लागलं आहे. यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. त्यांचे लोक स्थलांतरित झाले आहेत. त्यांची घरं उद्धवस्त झाली आहेत. आपल्या दुर्देशेसाठी कारणीभूत असलेल्या कारणांवर राजकीय समाधान काढता येईल ही त्यांची अपेक्षा संपत चालली आहे," असंही म्हटलं आहे. "मात्र पॅलेस्टाईनमधील लोकांनी केलेल्या तक्रारी या हमासवर हल्ला करण्याचा बचाव म्हणून योग्य ठरत नाहीत. तसेच पॅलेस्टाईनमधील लोकांवर सामुहिक दंडात्मक कारवाई केल्याचा दावा करत केले जाणाऱ्या हल्ल्यांचं समर्थन करता येणार नाही," असंही गुटेरस म्हणाले. 

मी त्यांना भेटणार नाही

गुटेरस यांनी केलेल्या विधानांवर कोहेन यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन टीका केली आहे. "संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना आपण भेटणार नाही. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या नरसंहारानंतर संतुलित दृष्टीकोन ठेवण्याचं सौदर्य त्यांनी दाखवलेलं नाही. हमासला संपवलं पाहिजे," असं कोहेन म्हणालेत.

दहशतवाद सहन करण्याची भूमिका अयोग्य

या वादानंतर संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे राजदूत गिलाद एर्दान यांनी, "महासचिव सर्व नैतिकता आणि निष्पक्षता विसारले आहेत. हे क्रूर हल्ले कारणाशिवाय नसू शकतात असं तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही दहशतवाद सहन करण्याची भूमिका घेता आणि दहशतवाद सहन करणाऱ्यांना योग्य ठरवता. मला वाटतं की महासचिवांनी राजीनामा द्यायला हवा. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे," असंही ते म्हणाले.