तुम्ही खाल्लाय का तरंगणारा Pizza? पाहा अंतराळातील पिझ्झा पार्टीचा अफलातून व्हिडीओ

अंतराळातली पिझ्झा पार्टी पाहून अनेकांनाच बसल्या ठिकाणी पिझ्झा खाण्याचा मोह आवरला नाही.   

Updated: Sep 7, 2021, 07:20 PM IST
तुम्ही खाल्लाय का तरंगणारा Pizza? पाहा अंतराळातील पिझ्झा पार्टीचा अफलातून व्हिडीओ  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : पिझ्झा (Pizza) खायला कोणाला आवडत नाही? पिझ्झा नको रे बाबा, असं म्हणणारे तसे फार क्वचितच. म्हणूनच की काय अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांनाही पिझ्झा खाण्याची इच्छा झाली. बस्स, मग काय तिथं सात समुद्र नव्हे तर या पृथ्वीच्याही बाहेर असणाऱ्या वेगळ्याच दुनियेत या अंतराळवीरांनी चक्क पिझ्झा करण्याचा घाट घातला. पिझ्झा बनवला आणि मोठ्या चवीनं तो खाल्लाही. 

सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट करत ही आगळीवेगळी पिझ्झा पार्टी साऱ्या जगात पोहोचवली. फ्रेंच अंतराळवील Thomas Pesquet यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला आणि तरंगणाऱ्या या पिझ्झाला पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 

हवेत तरंगणाऱ्या पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना पकडून त्यांना बेसवर ठेवत मग पूर्ण पिझ्झा तयार करत तो चवीनं खाण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया एका छानशा व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेल्या पार्श्वसंगीतामुळं पाहणाऱ्यांची उत्सुकता आणि अर्थाच भूकही शिगेलाच पोहोचल आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Thomas Pesquet (@thom_astro)

मित्रांसोबतची तरंगणारी पिझ्झा नाईट.... हा तर पृथ्वीवरचा एखादा शनिवार किंवा विकेंडच वाटतोय असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं. हा व्हिडीओ शेअर होताच तो वाऱ्याच्या नव्हे तर एखाद्या रॉकेटच्या वेगानं व्हायरल झाला आणि ही अंतराळातली पिझ्झा पार्टी पाहून अनेकांनाच बसल्या ठिकाणी पिझ्झा खाण्याचा मोह आवरला नाही.