जगभ्रमंतीची सुरूवात भारतापासून; चक्क कार चालवत निघाली प्रवासाला

जगभ्रमंती म्हटलं की, प्रत्येकालाच उत्सुकता असते. क्वचितच असे लोक असतील ज्यांना भ्रमंतीचा कंटाळा येत असेल. आयुष्यात एकदातरी जगभ्रमंती करावी असं अनेक व्यक्तीचं स्वप्न असते. त्यात स्वतः गाडी चालवत जगभ्रमंती म्हणजे विषयच वेगळा. 

Updated: May 18, 2022, 04:39 PM IST
जगभ्रमंतीची सुरूवात भारतापासून; चक्क कार चालवत निघाली प्रवासाला title=
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : जगभ्रमंती म्हटलं की, प्रत्येकालाच उत्सुकता असते. क्वचितच असे लोक असतील ज्यांना भ्रमंतीचा कंटाळा येत असेल. आयुष्यात एकदातरी जगभ्रमंती करावी असं अनेक व्यक्तीचं स्वप्न असते. त्यात स्वतः गाडी चालवत जगभ्रमंती म्हणजे विषयच वेगळा. 
 
स्वतः गाडी चालवत जगभ्रमंती करणारे अनेक व्यक्ती आपल्याला माहित असतील. मात्र मूळच्या भारतीय असलेल्या पण सध्या ब्रिटनचे नागरिकत्व असलेल्या भारुलता पटेल-कांबळे या 49 वर्षीय महिला असं आगळवेगळ धाडस करत आहेत.
भारुलता यांनी आता पर्यंत जवळपास 32 देश एकटीने स्वतः गाडी चालवत भ्रमण केले आहेत. काही देशांमध्ये तर त्यांनी आपल्या दोन मुलांना घेऊनही स्वतः कार चालवत भ्रमंती केली आहे.
 
एवढ्यावरच न थांबता, भारुलत यांनी आपल्या 16 वर्षीय प्रियम आणि 14 वर्षीय आरुषबरोबर जगभ्रमंतीची सुरूवात भारतातील गुजरातपासून सुरू केली आहे. भारतातील प्रत्येक राज्यात त्या स्वतः कार चालवत जाणार आहेत. भारतातील 773 जिल्ह्यात 65 हजाराहून अधिक अंतर त्या गाडी चालवत पार करण्याचा त्यांचा माणस आहे. 
 
भारुलता या पेशाने वकील आहेत तर त्यांचे पती हे डॉक्टर आहेत. आपल्या कुटुंबासमवेत त्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याने आपल्या मुलांना भारत कळावा, भारतीय संस्कृती कळावी हा उद्देश आहे. सोबतच भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाल्याने स्वातंत्र्यसैनिकांना सलाम करण्यासाठी त्या भारत भ्रमण करणार आहेत. त्या स्वतः कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बऱ्या झाल्या आहेत. यामुळे त्यांना कर्करोगावरील उपचाराबाबत जागरूकता निर्माण करायची आहे. 
 
भारुलता यांच्या नावावर आहेत जागतिक विक्रम
 
भारुलता यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आहेत. भारुलता यांनी एकटीने 32 देश स्वतः गाडी चालवत भ्रमण केले आहेत. 91 तास -45 डिग्रीमध्ये 4 हजार 500 किलोमीटर गाडी चालवत त्यांनी साऱ्या जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. 
 
त्यांच्या या धाडसाची नोंद गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डनेसुद्धा घेतली आहे. युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरममध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. पाच ब्रिटिश महिलांचे रेकॉर्डस् त्यांनी मोडीत काढले असून इंग्लंड, रशिया, फ्रान्स, नेर्लंड,बेल्जियन, पोलनाड, स्वीझेर्लंड, डेनमार्क, स्वीडन, स्पेन, चीन असे कितीतरी देश त्यांनी एकटीने गाडी चालवत पार केले आहे.
 
परदेशात आणि भारतात गाडी चालवण्यामध्ये प्रमुख फरक त्यांना ट्रॅफीक आणि वाहन चालवण्याच्या शिस्तीमध्ये जाणवला असल्याचे त्या सांगतात. जगभरात चीनचा विकास पाहून त्या प्रभावित जरी झाल्या असल्या तरीही भारतातील माणुसकी त्यांना अधिक आणि मनापासून भावल्याचं त्या आवर्जून सांगतात. 
 
भारुलता या कोणत्याही बॅकअप क्रू किंवा वाहनाशिवाय आपल्या मुलांसह गाडी चालवत फिरतात. त्यांच्या या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.