Nepal Aircraft Crash : नेपाळमधील पोखराजवळ यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान कोसळले आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे यति एअरलाइन्सचे एटीआर - 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. विमानात एकूण 86 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, अशी माहिती यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले आणि नदीत कोसळले. यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ कोसळलेले प्रवासी विमान यती एअरलाईन्सचे असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. दरम्यान अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
A 72-seater passenger aircraft crashes on the runway at Pokhara International Airport in Nepal. Rescue operations are underway and the airport is closed for the time being. Details awaited. pic.twitter.com/Ozep01Fu4F
— ANI (@ANI) January 15, 2023
पोखराजवळ विमान कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले. या विमान अपघातातील आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विमानात 5 भारतीय प्रवासीही होते. अपघातानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी आणि सर्व सरकारी यंत्रणांना तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघाताचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान दहल काठमांडू विमानतळावर रवाना झाले आहेत. पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
याआधीही भीषण अपघात
दरम्यान गेल्या वर्षी वर्षी मे महिन्यात खराब हवामानामुळे पहारी मुस्तांग जिल्ह्यात तारा एअरचे विमान कोसळले होते. या घटनेत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खराब हवामानामुळे विमान डावीकडे न जाता उजवीकडे वळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यामुळे विमान डोंगरावर जाऊन आदळले.