Ashadhi Ekadashi : भक्तांच्या महासागरातून कसा निवडला जातो मानाचा वारकरी? मिळतो शासकीय महापुजेचा मान

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरणी चंद्रभागेच्या काढी असणाऱ्या पंढरपुरात दाखल झाले आहेत.   

सायली पाटील | Updated: Jun 28, 2023, 05:02 PM IST
Ashadhi Ekadashi : भक्तांच्या महासागरातून कसा निवडला जातो मानाचा वारकरी? मिळतो शासकीय महापुजेचा मान  title=
Ashadhi Ekadashi 2023 how temple authority decides manacha warkari mahapuja mahurat time pandharpur

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : आषाढी एकादशीचं निमित्त साधत साधारण 20 दिवस आधीपासूनच राज्याच्या विविध भागांतून, खेड्यापाड्यातून वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली. संतमंडळींच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलं आणि ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत पंढरीच्या विठुरायाचरणी डोकं ठेवण्याची आस आणखी वाढली. मुखी हरिनाम आणि मनातही त्याच विठ्ठलाचं रुप हीच प्रत्येक वारकऱ्याची ओळख. अशा या भक्तांचा महासागर सध्या पंढरपुरात पोहोचला असून, विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रत्येतजण आसुसला आहे. 

आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांसाठी परवणी. अशा सर्व भक्तांमंडळींमधून काहीजणांना एक खास बहुमान मिळणार आहे. तो बहुमान असेल मानाचा वारकरी म्हणून विठ्ठलाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा. पण, हे मानाचे वारकरी निवडतात तरी कसे, माहितीये? 

असा निवडला जातो मानाचा वारकरी... 

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी देखील शासकीय पूजेला उपस्थित असतो. आषाढीच्या आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता दर्शन रांग थांबवली जाते. दर्शन रांग जिथे थांबवली जाते तिथे पती-पत्नी कोण आहेत याचा शोध घेतला जातो. पहिलं दांपत्य मिळाल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का याची विचारणा केली जाते. तुळशीची माळ गळ्यामध्ये असल्यास त्या वारकरी दाम्पत्याची मानाचा वारकरी म्हणून निवड केली जाते.

हेसुद्धा वाचा : Ashadhi Ekadashi 2023 : सुंदर ते ध्यान..! विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO

 

यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठलाच्या महापुजेसाठी पंढरपुरात आहेत. त्यांच्यासोबतच या महापुजेचा मान हा वारकऱ्यांचाही असणार आहे. यंदाची आषाढी वारकऱ्यांसाठी जास्तच खास आहे, कारण यावेळी शासकीय महापूजा सुरु असताना विठ्ठल भक्तांसाठी मुखदर्शनाची रांग सुरुच राहणार आहे. त्यामुळं दर्शनार्थींचा खोळंबा होणार नाही. 

मानाच्या वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा

मानाच्या वारकऱ्याची निवड झाल्यानंतर हे वारकरी जोडपं मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजा करत असतात. शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वारकरी दाम्पत्याचा सत्कार केला जातो. तसंच मानाच्या वारकऱ्यांना एक वर्षाचा एसटीचा प्रवास मोफत पासही दिला जातो. काय मग, पुढल्या वर्षी वारीला येऊन तुम्हालाही मानाचं वारकरी व्हायचंय का?