लाडक्या 'श्री' ला एका रसिकाच पत्र...!

प्रिय श्री,चटका लावून गेलीस ग !

Updated: Feb 26, 2018, 09:19 AM IST
लाडक्या 'श्री' ला एका रसिकाच पत्र...! title=
Image: PTI

प्रिय श्री,चटका लावून गेलीस ग !

१९८०-९० च्या काळात जेव्हा हेमामालिनी नावाचं सुखद स्वप्न आम्हा भारतीयांना रुंजी घालत होत तेंव्हा शिवकाशी सारख्या भागातून मुंबई गाठत प्रिय श्री तू फिल्मी दुनियेत अवतरलीस, त्या अगोदर शिवकाशीची आम्हाला ओळख ही केवळ फटाक्याचं गाव म्हणूनच होती, मात्र त्यानंतर तू शिवकाशी ला एक नवी ओळख दिलीस.

त्या अगोदर तू तुझ्या अदाकारीने तामिळ चित्रपटसृष्टी गाजवायला सुरवात केली होतीस मात्र कमल हसन सोबत तू सदमा च्या रुपानं तुझ्या अभिनयाचं कसब दाखवून दिलंस आणि बॉलिवूडला तुझी दखल घ्यायला भाग पाडलेस. 

"ताकी हो ताकी हो ताकी ताकी रे,जब से तू मेरे दिल मे झाकी" असं म्हणत जेव्हा तू जितू ला थिरकवायला लावलंस तेव्हा जितू च काय पण अख्खा देश तुझ्या तालावर नाचायला लागला.

नागीण मधील तुझे जुल्मी डोळे बघून प्रत्येक जण तुझ्या प्रेमातच पडला. तुझ्या अदाकारीच गारुड असं काही होत की प्रत्येक जण आपल्या घरात सुद्धा तूच माझी श्रीदेवी असं म्हणून संसारसुखाचा आनंद घेऊ लागला.

आजही आठवत की कॉलेज असो की तरुणांचा कट्टा कोणीही एखादी सुंदर तरुणी दिसली की आली बघा श्रीदेवी म्हणून टोंट मारायचे. तू एखाद्या वादळासारखी बॉलिवूडमध्ये आलीस आणि तुझी मोहिनी तमाम रसिक प्रेक्षकांवर घातलीस. सदमा चित्रपटापासून सुरू झालेला तुझा प्रवास मॉम चित्रपटापर्यंत येऊन थांबला. चालबाज असो की मिस्टर इंडिया अथवा आखरी रास्ता, प्रत्येक चित्रपटात तू नेहमीच वेगळी वाटलीस. चांदणी मधील तुझा अल्लड अभिनय आजही आठवणीत राहतो, लम्हे मधील अनिल कपूर सोबतची शांत अभिनेत्री अजूनही आमच्या मनात घर करून राहिली आहे.

रेखा, जयाप्रदा, हेमामालिनी यांच्यानंतर बॉलिवूड ने तुझ्यावर भरभरून प्रेम केलं, रसिकांनी तुझ्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं. ९०च्या दशकात रसिकांच्या मनावर तू अधिराज्य गाजवलस. तुझ्या बॉलिवूडमधील एन्ट्रीने ड्रीमगर्ल हेमामालिनीचं आसन देखील डळमळीत केलं होतंस. तुझ्या एका-एका चित्रपटाचं पारायण करणारे हजारो चाहते आजही सापडतील.

तू म्हणजे बॉलिवूडला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतीस, प्रत्येक जण तुझ्यात आपली मैत्रीण, सहचारिणी पाहत होता. उत्कृष्ट अभिनयाचं तू विद्यापीठ होतीस,नवीन कलाकारांसाठी तू एक आदर्श होतीस, तामिळ, तेलुगू या सोबतच तू बॉलिवूड आणि छोटा पडदा सुद्धा गाजवलास.

तब्बल पन्नास वर्षे तू रुपेरी पडद्यावर आपल्या अदाकारीने वर्चस्व गाजवलंस, पन्नास वर्षाचा काळ थोडा थोडका नसतो ग, मात्र एवढ्या लवकर जगाचा निरोप घेण्यासारखा देखील नसतो.

तू अशी अचानक आम्हाला सोडून एक्झिट घेशील हे स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं. तुझं अस जाणं आम्हाला सदमा देणारं आहे. 'मेरे हाथो में नौ नौ चुडीया है' अस म्हणत आजही अनेक तरुण पोरी तुझ्या सारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करतात.

तू तुझ्या सौंदर्याच्या बाबतीस आणि शरीर प्रकृतीच्या बाबतीस भलतीच काँशियस होतीस ग, तरीसुद्धा तू अशी अचानक एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाशील अस वाटलं नव्हतं. तुझ्या एक्झिटची बातमी घेऊन आजचा सूर्य उगवला आणि रसिकांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. श्री खरोखरच तू एक दैवी देणगी होतीस, अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हाला सोडून गेलीस. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात मात्र देवही एवढा निष्ठुर कसा होऊ शकतो हाच प्रश्न आम्हाला पडला आहे .

तुझाच एक चाहता
लक्ष्मीकांत रुईकर, बीड