जयंत माईणकर : १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरानी काँग्रेसचे उमेदवार स्व मधुसूदन वैराळे यांची चांगलीच दमछाक केली आणि आपल्या काँग्रेस विरोध आणि आतून भाजपला मदत करणाऱ्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली.
इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेतही वैराळे केवळ थोड्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर आजतागायत अकोल्याची जागा एकतर भाजप किंवा प्रकाश आंबेडकर जिंकू शकले आहेत.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ आंबेडकरांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ३४ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सतत तीच भूमिका कायम ठेवली.
आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल इ मुसलमीन या पक्षाशी हातमिळवणी करण्याची घोषणा करून आपली ताकद वाढविण्याचा आणि भाजप विरोधी आघाडीला कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्रश्न जसजसा तापू लागला तसतसे एका बाजूला हिंदूत्ववादी मतदार आणि दुसऱ्या बाजूला विघटित असलेले गैर हिंदुत्ववादी मतदार असं नवीन समिकरण तयार झालं आणि या विघटनाचा फायदा घेत भाजप आतापर्यंत चार वेळा केंद्रात सत्तेवर येण्यात यशस्वी झाला.
१९८९ साली लोक सभा निवडणुकीत मुंबईच्या उत्तर -पूर्व मतदारसंघात काँग्रेसच्या स्व गुरुदास कामत यांच्या विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे डॉ नीलम गोऱ्हे याना उमेदवारी दिली.
गैर हिंदुत्ववादी मतदानाच्या विभाजनात भाजपच्या जयवंती बेन मेहता निवडून आल्या होत्या.
एमआयएम हा हैदराबाद स्थित मुस्लिम समाजाचा एक ताकदवान पक्ष.
असदुद्दीन ओवैसी म्हणजे हा पक्ष स्थापणाऱ्याची तिसरी पिढी. त्यांचे वडील ही 1984 पासून 2004 पर्यंत हैदराबाद येथून खासदार होते.
आज त्यांचा मोठा मुलगा खासदार तर मुलगा अकबरुद्दीन आमदार आहेत.
मुस्लिम समाजाला नजरेसमोर ठेवून या पक्षानी उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या ठिकाणी आपले उमेदवार उभे करून प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याना फार यश आले नाही. मात्र महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेस ची चांगलीच दमछाक केली आणि दोन आमदारही निवडून आणले.
आंबेडकरांप्रमाणेच त्यांनीही तोंडावर काँग्रेस विरोध आणि आतून भाजपला मदत अस धोरण अवलंबिले.
आज महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सुमारे १० टक्के दलित आणि १० टक्के मुस्लीम आहेत. हे दोन्ही समाज गठ्ठा मते देण्यासाठी आणि मुख्यत्वे भाजपविरोधी मतदान करणारे म्हणून मानले जातात.
आज देशभरात भाजप विरोधी आघाडीसाठी कम्युनिस्ट, समाजवादी, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष एकत्र येत असताना आंबेडकर-ओवैसी यांची तिसरी आघाडी महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांना मदतच करील.
कारण या २० टक्के मतांपैकी किमान पाच टक्के मते जरी, ही तिसरी आघाडी आपल्याकडे वळवू शकली, तरी ती मते भाजपच्या विजयकरीता निर्णायक ठरतील.
अर्थात भारतीय लोकशाही ही सुजाण आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम हे केवळ शिवसेनेची मतं खाणे इतकेच आहे, हे लक्षात आल्यावर 2009 साली 13 जागा देणाऱ्या मतदारांनी 2014 साली त्यांची बोळवण केवळ एक जागेवर केली.
आज आंबेडकर-ओवैसी हे भाजप विरोधी मते खाण्याचं काम करत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुजाण मतदार त्यांची अवस्था काय करतील हे निवडणूकित दिसेलच. घोडा मैदान दूर नाही.