Why Was Rumali Roti Created: रुमाली रोटीबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. हॉटेलमध्ये गेल्यावर मोठ्या आवडीने रुमाली रोटी मागवली जाते. चिकन किंवा मटण असेल तर रुमाली रोटी वाढली जाते. पण तुम्हाला माहितीये का आज मोठ्या आवडीने खाल्ली जाणारी रुमाली रोटी मुळातंच खाण्यासाठी बनवण्यात आली नव्हता. ज्या कामासाठी रुमाली रोटी बनवण्यात आली होती ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रुमाली रोटी बनवण्यामागचा नेमका उद्देश काय होता?
खरं तर रुमाली रोटी बनवण्याची सुरुवात मुघल काळापासून झाली. मुघल काळात शाही भोजनाच्या पंगतीत रुमाली रोटीदेखील वाढण्यात यायची. मात्र तेव्हा ही रोटी खाल्ली जायची नाही. तर, या रुमाली रोटीचा वापर शाही भोजनातील अतिरिक्त तेल शोषून घेण्यात किंवा पुसण्यासाठी करायचे. रुमाली हे नाव हिंदी शब्द रुमाल नावाने आला आहे. रुमालाचे कामच हात, नाक आणि तोंड पुसणे याव्यतिरिक्त लोक रुमालाचा वापर एखादी वस्तु किंवा जागा साफ करण्यासाठीदेखील करतात.
जेवणात असलेले अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी तेव्हा रुमाली रोटी वापरली जायची. मुघल काळात रुमाली रोटी रुमालाप्रमाणेच घडी करुन राजे-महाराजांच्या जेवणाच्या टेबलवर ठेवण्यात यायची. रुमाली रोटी खूप पातळ आणि नरम रोटी असते. आज रुमाली रोटी मोठ्या आवडीने रेस्तराँ किंवा ढाब्यावर खाल्ली जाते.
रुमाली रोटी ही पहिल्यांदा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाली होती. या रोटीला पाकिस्तानात मांडा किंवा लंबू रोटी नावाने ओळखलं जातं. रेस्तराँ किंवा हॉटेलमध्ये रुमाली रोटी मलाईदार करीसोबत वाढतात. किंवा मुघल खाद्यपदार्थांबरोबर रुमाली रोटी खाल्ली जाते.
रुमाली रोटी ही गहू आणि मैदाच्या पीठापासून बनवली जाते. आज आपण याची रेसिपी पाहूयात.
साहित्य
मैदा- 2 कप
गव्हाचे पीठ-1/4 कप
दूध- 1 कप
तेल- 2 टेबलस्पून
मीठ- चवीनुसार
कृती
सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ आणि मैदा टाकून त्यात थोडे मीठ टाका आणि थोडे थोडे दूध टाकून पीठ मळून घ्या. त्यानंतर थोडे तेल टाकून पुन्हा एकदा पाच मिनटे पीठ मळून घ्या. पीठ जो पर्यंत नॉन स्टिकी होत नाही तोपर्यंत मळून घ्या. त्यानंतर 3-4 तासांसाठी असंच ठेवून द्या.
त्यानंतर पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला मैदा लावून लाटून घ्या. रोटी खूप पातळ लाटून घ्या. लक्षात घ्या की लाटताना मैद्याच्या पीठाचा वापर करा. आता मांडा म्हणजेच कढाई उलटीकरुन गॅसवर ठेवून द्या. गॅस मोठा करा. कढई गरम झाल्यावर त्यावर मीठाचे पाणी शिंपडा. जेणेकरुन रुमाली रोटी चिटकणार नाही. आता त्या कढाईवर रोटी टाका आणि हाताच्या मदतीने सगळीकडे पसरवून घ्या. रोटी चांगली शिजली की पलटवून घ्या. शेवटी रोटी घडी करुन ठेवा. गरमा गरम रोटी चिकन करी किंवा मटणसोबत खायला घ्या.