जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : टीव्ही मीडियात सध्या अर्णब गोस्वामींच्या अटकेचा मुद्दा जोर धरुन आहे. तिकडे वेब मालिकांमध्ये हर्षद मेहता यावर आधारीत स्कॅम १९९२ चर्चेत आहे. तर यूट्यूबवर बाबा का ढाबा स्कॅमची मालिका सुरु झाली आहे. बाबा का ढाबा हा विषय संपलाय असं सर्वांना वाटतं, पण आणखी वाढतोय. कांता प्रसाद बाबांकडे आता एवढे पैसे आहेत, की त्यांनी त्यांच्या त्या ढाबासारख्या दुकानाचा विस्तार करायचं ठरवलं आहे.
हा निर्णय बाबांनी आता पहिल्यांदाच एक मॅनेजर कामावर ठेवला आहे, त्याने घेतलाय. बाबांची आता ऐट वाढलीय. ते भाड्याचं एक दुकान घेऊन ते वाढवणार आहेत.
कांता प्रसाद बाबा यांनी पहिलं काम केलं, ते डोळ्याच्या मोती बिंदूंचं ऑपरेशन. कांता प्रसाद यांचा आरोप आहे की ब्लॉगर गौरव वासन याने त्यांना फसवलं आहे, त्यावर त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वकील लावलाय. ते गाडीने पोलीस स्टेशनला दाखल होतात. गाडी त्यांची नसेल, पण बाबांचं स्टेटस वाढलंय.
कांता प्रसाद हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गेटवर आल्यावर इतर यूट्यूबर्सने त्यांना घेरून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कांता प्रसाद यांनी देखील त्यांना राजकीय व्यक्तीसारखी उत्तरं दिली.
आता बाबा का ढाबा या स्कॅमची चौकशी दिल्ली पोलीस करणार आहेत. यात ब्लॉगर गौरव वासन याने इतर यूट्यूब आणि न्यूज चॅनेल्सवर आपली बाजू मांडायला सुरुवात केली आहे.
गौरव म्हणतो की, मी या आधी कोणत्याही व्यक्तीच्या मदतीसाठी लोकांना पैसे देण्याचं आवाहन केलं नाही. पण मी त्यांचे अश्रू पाहून भावनिक झालो, आणि व्हिडीओ बनवत असतानाचं मदत करण्याचं आवाहन केलं. मी माझा बँक अकाऊंट नंबर दिला हे खरं आहे. कारण मला वाटलं होतं, कांता प्रसाद बाबा यांना ३० ते ३५ हजार रुपये मदत येईल. काही लोकांना पेटीएमने मदत करायची होती, म्हणून मी बायकोच्या पेटीएमचा संदर्भ दिला.
मला जेवढे पैसे आले, तेवढे मी त्यांच्या अकाऊंटला दिले, त्यांना चेकही दिले. मी सर्व चौकशींना सामोरा जाण्यास तयार आहे. जेव्हा बाबांच्या अकाऊंटला २० लाखांच्यावर रक्कम आली. तेव्हा कांता प्रसाद बाबा यांच्या परवानगीनेच मी आणखी मदत नको, असं आवाहन केलं.
माझा हा कांता प्रसाद बाबा यांच्या ढाब्याचा व्हीडिओ खूप व्हायरल झाला. मला वाटलं नव्हतं एवढी मदत येईल. पण कांता प्रसाद यांच्या मनात कुणीतरी माझ्याविषयी दिशाभूल करणारी माहिती दिली.
कांता प्रसाद यांचे दिवस बदलले याचा आनंद आहे, पण ज्या प्रकारे माझी बदनामी होत आहे, माझ्या परिवाराला शिव्या दिल्या जात आहेत, याचं दु:ख आहे, आता जे सत्य आहे ते समोर येईलच, असं ब्लॉगर गौरव वासन याने म्हटलं आहे.
बाबा चुकले आहेत असं त्यांना समजलं आणि त्यांनी ते मान्य केलं तर तुम्ही काय म्हणाल असा प्रश्न गौरव वासनला विचारला गेला, त्यावर गौरव म्हणतो, बाबा माझ्यासाठी पुज्यनीय आहेत, ते ज्येष्ठ नागरीक आहेत, तर बाबा कांता प्रसाद यांना देखील विचारण्यात आलं, गौरवची याच्यात चूक नाही असं समजलं तर काय करणार, त्यावर कांता प्रसाद म्हणतात, तो माझ्या मुलासारखा आहे, मी त्याची माफी मागेन.
आता बाबा कांता प्रसाद यांची बाजू सत्य की, ब्लॉगर गौरव वासन याची योग्य ते समोर येईलच...पण एका व्हीडिओने कांता प्रसाद यांचं आयुष्य बदललं, आणि एवढी मोठे एपिसोड निघाले, आता याची समाप्ती कशी होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे....म्हणून 'बाबा का ढाबा'चा पिक्चर अभी बाकी है...मेरे दोस्त.