रायबरेलीची 'मठी' तुटेल का?

रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचा मठ. वर्षानुवर्षांची गांधी घराण्याची ‘मठी’ तुटेल का? हे रायबरेलीच्या जनतेच्या हातात आहे...

रामराजे शिंदे | Updated: May 14, 2019, 08:45 AM IST
रायबरेलीची 'मठी' तुटेल का? title=
फाईल फोटो : सोनिया गांधी

रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली

अमेठी ते रायबरेलीचे अंतर साधारण दीड तासाचे... कोणत्याही शहराची अवस्था कशी आहे? हे अगोदर बस स्टँडवर गेल्यानंतर कळतं. त्यामुळे रायबरेली बस स्टँड गाठलं. रायबरेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेले अनेक जण भेटले. बस स्टँडवरची अस्वच्छता पाहून स्वच्छ भारत अभियानाचं इथं कोणतंही अस्तित्व नसल्याची खात्री पटली. अमेठीपेक्षा रायबरेली मोठं आहे. इथल्या लोकांचं राहणीमान अमेठीवासियांपेक्षा सुधारलेलं आहे. मात्र गांधी घराण्याचा वारसा असलेल्या रायबरेलीचा विकासही खुंटलेला दिसतोय. रायबरेलीत बस स्टँड पासून काही अंतरावरच फिरोज गांधी महाविद्यालय आहे. रायबरेलीतील हे प्रसिद्ध कॉलेज... त्याशिवाय शिक्षण, क्रिडा प्रकारात रायबरेलीचं नाव घ्यावं असं काही विशेष दिसून आलं नाही. रायबरेलीतील खाजगी हॉस्पीटलसमोर एका चहावाल्याकडे चांगली गर्दी जमली होती. रायबरेलीचा हा चहावाला चांगलाच प्रसिद्ध आहे. तिथल्या लोकांशी गप्पा सुरू केल्या. चहाच्या टपरीसमोर रस्त्याचं काम सुरू होतं. तिथं चहा पिण्यासाठी बसलेल्या मुकेश कुमार या तरूणाला विचारलं, ’सोनियाजी ने कुछ काम किया क्या?’ त्यावर तो म्हणाला, ‘५ वर्षात तर कधी मतदारसंघात आल्या नाही. कोणती कामे केली नाही. आता निवडणूक आहे तर रस्त्याची कामं सुरू केली आहेत. हा पुरावा तुमच्या समोर आहे. या रस्त्याचं काम कित्येक वर्षापासून रखडलं होतं. आता केलं जातंय. हे आधी का केलं नाही.’ मी विचारलं, ’सोनियाजींनी काय काम केलं?’ त्यावर दुसरा एक जण म्हणाला, ‘रायबरेलीत आत्ता जे काही दिसतंय ते इंदिरा गांधींनी केलंय. सोनियांनी काहीच केलं नाही. आता महिनाभरापासून काँग्रेसचे सगळे नेते भेटायला येतात.’ 'यासाठी जबाबदार कोण' त्यावर सुनील कुमार म्हणाला, ‘यासाठी सध्याचे पाच वर्षे जबाबदार नाही तर मागील १५ वर्षे जबाबदार आहेत. मोदींनी देशासाठी काहीतरी केलं. पण काँग्रेसनं काय केलं. इथे उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण केलं नाही. त्यामुळे इथले लोक व्यापार, उद्योग व्यवसायात मागे आहेत.’ त्याला मी पुन्हा विचारलं, ’तरी तुम्ही सोनिया गांधी यांना निवडून दिलं आणि आत्ताही त्यांचा पराभव होईल असं वाटत नाही’ यावर तो म्हणाला, ‘इंदिरा गांधीचा पराभव रायबरेलीतच झाला. मग त्यांचा पराभव होऊ शकतो तर सोनिया गांधीचा पराभव का होऊ शकत नाही?' यावर आसपासच्या कामगारांनी टाळ्या वाजवल्या. इथल्या तरूणांशी गप्पा मारताना सर्जिकल स्ट्राईक आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टींचा त्यांच्यावर प्रचंड परिणाम झाल्याचं जाणवलं.

आमच्या चर्चेत पेशानं शिक्षक असलेल्या रमेश सिंग यांनी उडी घेतली. ते म्हणाले, ‘इंदिराजींच्या काळात ग्रेटर नोएडा रायबरेली परिसरात बनवण्याचा विचार सुरू होता. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आता ग्रेटर नोएडा दिल्लीजवळ आहे. त्यामुळे आमचं नुकसान झालं. इथे काही कंपन्या आल्या पण स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. प्रत्येक वेळा उमेदवार बदलेल... रायबरेलीचं राजकारण बदलेल'.

उद्योगाची परिस्थिती काय आहे? हे जाणून घेण्यासाठी रायबरेलीतील मिल एरियामध्ये गेलो. मिल एरिया सुरू झाल्यापासून उजव्या बाजूला सर्व कंपन्या बंद पडलेल्या दिसल्या. संध्याकाळची वेळ होती. काही कामगार सायकलीवरून घराकडे निघाले होते. त्यांना थांबवून रस्त्यातच थांबवून गप्पा मारल्या. या १०-१२ कामगारांनी सर्व हकीकत सांगितली. बंद पडलेल्या प्रत्येक कंपन्याची माहिती दिली. हेच कामगार या कंपन्यात काम करत होते. परंतु कंपन्या बंद पडल्यामुळे आता छोटं-मोठं मिळल ते काम करतात. संजीव सिंग या कामगाराने सांगितले, रायरेलीत जेवढ्या मोठ्या कंपन्या होत्या, त्या सर्व इंदिरा गांधी यांनी सुरू केल्या. परंतु सोनिया गांधी यांनी त्या टिकवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. इथे १३० वेगवेगळे कारखाने होते. त्यात काही सरकारी होत्या. परंतु त्यापैंकी १२० कारखाने बंद झाले. एका एका कारखान्यात १० हजार कामगार काम करत होते. ते सगळे कामगार रस्त्यावर आले. या सरकारी कंपन्या तरी सुरू ठेवाव्या यासाठी मी स्वतः २०१२ मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की, इंदिरा गांधी यांनी हा कारखाना सुरू केला आहे. तो बंद पडू देऊ नका. त्यावर त्या म्हणाल्या, मी काय करू शकत नाही.

रंजन नावाचा कामगार म्हणाला, ‘आम्ही आता दुसरीकडे कारखान्यात काम करतो. तिथे मालक मनमानी करतो. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत म्हणजे ९ तास काम केल्यावर २९५ रूपये मिळतात. त्यातून ४० रूपये मालक कापून घेतो. कामाशिवाय झाडूपासून ते सर्व गोष्टी करून घेतात. परंतु त्याचे पैसे देत नाही. सुट्टी तर अजिबात मिळत नाही. या विरोधात काही बोललं तर बडे नेता बनने लगे हो, असं म्हणून नोकरीवरून काढलं जातं. म्हणून आता बदल व्हायला पाहिजे. मोदी काहीतरी करतील अशी आम्हाला आशा आहे.’ यातून कामगार वर्गात मोदीबद्दलची वाढलेली क्रेझ दिसून येते. तेही रायबरेलीत...


फोटो : कारखाने बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेले कामगार

 

रायबरेलीत काँग्रेसच्या कार्यालयात गेलो असता काही पदाधिकारी भेटले. मी त्यांना विचारले, मागील १५ वर्षात रायबरेलीत विकास का झाला नाही? त्यावर ते म्हणाले, 'आम्ही एम्स आणण्याचा प्रयत्न केला. पण ९०० बेडवरून ३०० बेड करण्यात आले. रेल कोच फॅक्ट्री, रेल्वे व्हील फॅक्ट्री, पेट्रोलियम टेक्नालॉजी इंन्स्टिट्यूट, फूटवियर डिजाइन एण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, फूड पार्क, स्पाइस पार्क आणि मोटर ड्राइविंग कॉलेजसारखे प्रकल्प आणले. परंतु भाजप सरकारने विकास कामे रोखली आहेत आणि यापूर्वी बसपा-सपा सरकारने रायबरेलीत विकास होऊ दिला नाही. मी त्यांना प्रश्न केला की, आता तर सपा-बसपाने सोनियाजींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी उमेदवारही उभा केला नाही. याचा अर्थ सपा-बसपा सोबत सोनियाजींचे चांगले संबंध आहेत. मग विकासकामे करण्यात सपा-बसपा कुठे आडवी आली. यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते.

बाहुबली विरूद्ध सोनिया

रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांची अखेरची निवडणूक आहे. आत्ताच त्या रायबरेलीत प्रचार करू शकत नाहीत. त्यामुळे मतदारांना भेटताना मर्यादा येत आहेत. परंतु आत्ता भाजपने दिनेश प्रताप सिंग यांना उमेदवारी दिल्यामुळे सोनिया गांधी यांची लढाई सोपी झाली आहे. दिनेश प्रताप सिंग हा रायबरेलीचा बाहुबली असून यापूर्वी काँग्रेसमध्येच होता. सोनिया गांधी यांचा अत्यंत विश्वासूपैंकी एक. सोनिया गांधी यांनी दिनेश प्रताप सिंगला विधान परिषदेवर आमदार केले. अद्यापही त्याने राजीनामा दिला नाही, तो काँग्रेसतर्फेच आमदार आहे. १० महिन्यापूर्वीच दिनेश प्रताप सिंग याने भाजपात प्रवेश केला. दिनेश सिंग यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण म्हणजे अखिलेश यांची मुलगी आदिती सिंग. आदिती सिंग हिला काँग्रेसमध्ये घेऊन आमदार केले. त्यामुळे दिनेश प्रताप सिंग नाराज झाले. दरम्यान अमित शाह यांच्या संपर्कात आले. त्यामुळे दिनेश सिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जाणे पसंद केले. अमित शाह यांनी त्याला ताकद दिली. दिनेश प्रताप सिंग याचा भाऊसुद्धा काँग्रेसमध्येच पदाधिकारी आहे. एकाच घरात दोघेही राहतात. सकाळी उठल्यांतर दिनेश प्रताप भाजप कार्यालयात आणि त्यांचा भाऊ काँग्रेस कार्यालयात जातो. सोनिया गांधी यांच्यासाठी आत्तापर्यंत सर्व निवडणुकीत बूथ कॅप्चरिंग आणि इतर सर्व काम दिनेश प्रताप सिंग करत असे. त्यामुळे काँग्रेसची नस ना नस त्याला माहित आहे. त्याचा फायदा होईल असा उद्देश अमित शाह यांचा होता. परंतु दिनेश प्रताप सिंग भाजपमध्ये आल्यामुळे भाजपचा मतदार नाराज आहे. दिनेश सिंग याने वर्षानुवर्षे भाजप कार्यकर्त्यांविरोधात काम केले. अनेक वेळा मारहाण केली. ते व्रण अजूनही भाजप कार्यकर्ते पाठीवर घेऊन फिरत आहेत. त्यातच मागील वेळेसचा भाजप उमेदवाराला यावेळी डावलण्यात आले. तोही नाराज आहे. शिवाय दिनेश प्रताप सिंग यांचे आरएसएससोबत जमत नाही. बाहुबली असल्यामुळे आपले वर्चस्व दाखविण्याच्या नादात अनेकदा संघाच्या ज्येष्ठांचा अपमान केला. त्यामुळे रायबरेली मतदारसंघात दिनेश प्रताप सिंग यांचे काम करण्यास संघ कार्यकर्त्यांनी हात वर केले. त्यामुळे दिनेश प्रताप सिंग यांचा पराभव भाजपचे कार्यकर्तेच करणार आहेत. म्हणूनच सोनिया गांधी यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. जर दिनेश प्रताप सिंग यांच्या व्यक्तीरिक्त भाजपने कोणताही चेहरा दिला असता तर रायबेरलीतून सोनिया गांधी आश्चर्यकारक मतांनी पराभूत झाल्या असत्या.


फोटो : दिनेश प्रताप सिंग आणि अमित शाह

सोनिया गांधी कशा पराभूत होतील, असा अनेकांचा प्रश्न असेल. सोनिया गांधी यांचे वय, मतदारांशी तुटलेली नाळ, मोदींची तरूणाईमधील क्रेझ आणि विकास केला नसल्यामुळे सोनियांवरील नाराजी वाढली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी परिस्थिती आता राहीली नाही. तरीही केवळ जातीय गणित आणि भाजपचा उमेदवार यामुळे सोनिया गांधी विजयी होऊ शकतात. जातीय समीकरण पाहिलं तर रायबरेलीत एकूण १६ लाख मतदार आहेत. त्यापैकी ८ लाख आदिवासी, दलित आणि ओबीसी आहेत. तर ४ लाख मुस्लिम आहेत.  सपा आणि बसपचा पाठींबा असल्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही. आणि सोनिया गांधी निवडून येतील.

१०० वर्षांपासून गांधी घराण्याचं राज्य

रायबरेलीशी नेहरू-गांधी कुटुंबाचा शंभर वर्षापासून संबंध राहिला आहे. सर्वप्रथम पंडीत नेहरू १९२१ मध्ये शेतक-यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराला विरोधी करण्यासाठी नेहरू रायबरेलीला आले होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर फिरोज गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली. ते १९५२ आणि १९५७ दोन वेळा खासदार झाले. फिरोज गांधी यांच्यानंतर त्यांच्या पत्नी इंदिरा गांधी यांनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले. १९७७ मध्ये राज नारायण यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. त्यानंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी दोन मतदारसंघातून लढल्या आणि विजयी झाल्या. त्यानंतर रायबरेलीची जागा भाचा अरूण नेहरू याच्यासाठी सोडली. १९९६ आणि १९९८ मध्ये इथे विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाला. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसचे सतीश शर्मा जिंकले. सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात १९९९ पासून अमेठीतून सुरू केली असली तरी २००४ मध्ये त्यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली.

रायबरेलीला गांधी घराण्याचं वलय आहे. २००४ मध्ये पहिल्यांदा रायबरेलीतून विजयी झाल्या. त्यानंतर २००६ मध्ये लाभाचे पद प्रकरणी राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत ४.१८ लाख मतांनी विजयी झाल्या. नंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत साडेतीन लाखांच्या मताधिक्याने त्या जिंकून आल्या. २००९ मध्ये त्यांच्या विरोधात लढलेले आर बी सिंग यांना २५ हजार तर २०१४ मध्ये अजय अग्रवाल यांना १ लाख मते मिळाली. यावरून सोनिया गांधी यांची ताकद दिसून येते.


फोटो : फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी

राष्ट्रीय सुरक्षा हा पहिल्या दोन-तीन टप्प्यात प्रचाराचा मुद्दा राहीला परंतू चौथ्या टप्प्यानंतर पूर्णत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ध्रुवीकरण झालं. याचा उत्तर प्रदेशात चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे चौथा, पाचवा सहावा आणि सातव्या टप्प्यात भाजपच्या बाजूने हवा असल्याची जाणवतेय. या टप्प्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या हिंदी पट्ट्यातील मतदारसंघ येतात. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांचा परिणाम होताना दिसून येत आहे. परंतु रायबरेलीत नेमकं उलटं आहे. इथे हिंदुत्वाचा मुद्दा काम करत नाही तर विकासाचा मुद्दा ज्वलंत आहे. विकासाच्या मुद्द्यावरूनच सोनिया गांधी यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. परंतु गांधी घराण्याला आता रायबरेली जिंकणं सोप्पं राहीलं नाही. जनता उघडपणे सोनिया गांधी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. हे यापूर्वी दिसत नव्हतं. आता ते घडतंय. रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचा मठ. वर्षानुवर्षांची गांधी घराण्याची ‘मठी’ तुटेल का? हे रायबरेलीच्या जनतेच्या हातात आहे. परंतु यापुढे रायबेरलीचा ‘मठाधीश’ बदलेला दिसेल, हे नक्की.