कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई : इतिहासात महान अशी कामगिरी करणारे गणिततज्ज्ञम्हणजे श्रीनिवास रामानुजन अय्यंगार. रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ एरोड, मद्रास प्रांतात झाला होता. रामानुजन हे एक ब्रिटिश भारत गणिततज्ज्ञ होते. ज्यांनी गणिताची परिभाषाच बदलून टाकली.
रामानुजनचे बालपण फार कष्टात गेले होते. रामानुजन यांचे वडील के. श्रीनिवास आणि आई कोमलताम्मा यांनी त्यांना वाढवले. लहापणापासून रामानुजन यांना गणित विषयाची विशेष आवड निर्माण झाली होती. घरची परिस्थिती इतकी चांगली नसतानाही ती त्यांच्या शिक्षणात कधीच आडवी आली नाही. त्यावर मात करत त्यांनी यावर विजय मिळवला.
रामानुजांनानी वयाच्या सातव्या वर्षी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत प्रवेश मिळाला. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांनी अनेक प्रमेय आणि संशोधन केले. रामानुजन जेव्हा गणिताचे सिद्धांत सांगायचे तेव्हा त्यांच्या शिक्षकांना देखील त्यांच्या बुद्धीचे आश्चर्य वाटायचे. इतक्या कमी वयात इतकी बुद्धीमत्ता पाहून शिक्षकही चकीत होऊन जात असत.
प्राथमिक शिक्षण घेत असतांना पुढच्या वर्गातील गणितं देखील ते सोडवत असतं. रामानुजन यांनी कोणताही गुरु नसताना देखील गणिताचं इतकं अफाट ज्ञान मिळवलं होतं. प्राथमिक परीक्षेत पूर्ण जिल्ह्यातून ते अव्वल आले होते. बालपणापासूनच रामानुजन यांना प्रश्न विचारण्याची सवय होती. त्यांचे प्रश्न हे सामान्य नसायचे. जसे या पृथ्वीवरचा पहिला मनुष्य कोण होता? पृथ्वी आणि ढगातील अंतर किती आहे? हे जाणून घेण्याची त्यांची उत्सूकता असायची.
रामानुजन हे फार प्रामाणिक होते. रामानुजनाची वागणूक खूप गोड आणि शांत होती. त्यांनी कधीही कोणाला नाराज केलं नाही. उच्च माध्यमिक परीक्षा उतीर्ण केल्यानंतर त्यांना गणित आणि इंग्रजी विषयात चांगले गुण मिळाले. ज्यामुळे पुढे त्यांना सुब्रमण्यम शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. रामानुजन यांना गणित शिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयात जास्त रस नव्हता. त्यामुळे रामानुजन १२ वीत नापास देखील झाले.
रामानुजन गणिताचा इतका विचार करायचे की झोपेत सुद्धा ते गणितंच सोडवत असत. त्यानंतर लगेच झोपेतून उठून ते गणिताची सूत्र लिहित असतं. काही शास्त्रज्ञांच्या मते, त्यांच्या स्प्नात नामगिरी नावाचे त्यांचे कुलदेवत येत असत. तेच त्यांना मार्गदर्शन करत असत. असं म्हटलं जातं.
रामानुजन यांनी आयुष्यभर गणिताचे ३,८८४ प्रमेय संकलित केले. रामानुजन हे एका गरीब कुटुंबातील असून देखील त्यांच्या चिकाटीमुळे आज त्यांना जगभरात महान गणिततज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांनी अनेक गणित विषयात शोध लावले आहेत.
रामानुजन यांच्या पहिल्या संशोधनावर 'इंडियन मॅथेमॅटिकल' सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली लेख छापून आला होता. त्यामुळे त्यांना जगभरात ओेळखलं जाऊ लागलं. तेव्हा त्यांचे वय २३ वर्ष होते. इतक्या कमी वयात त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख जगात निर्माण केली होती.
१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला होता. हार्डी हे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ होते. त्यांनी गणित विषयात अनेक शोध लावले होते. त्यामुळेच रामानुजनने त्यांना पत्र लिहले. प्रोफेसर हार्डी मार्गदर्शन करेल अशी रामानुजन यांची अपेक्षा होती.
रामानुजनचे पत्र वाचतांच हार्डी यांना वाटले की, रामानुजन हे गणित विषयाचे गाढे अभ्यासक आहे आणि सर्वोत्तम दर्जाचे गणिततज्ज्ञ आहेत. प्रोफेसर हार्डीमुळे रामानुजन यांना लवकरच इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि १७ मार्च १९१४ रोजी ते इंग्लंडला जाण्यासाठी निघाले.
त्यानंतर रामानुजन यांनी त्यांचे संशोधनाचे काम सुरू ठेवले. १९१४ ते १९१७ या तीन वर्षांच्या कालखंडात रामानुजन यांनी ३२ संशोधनांवर लेख लिहिले. त्यांना १९१८ साली रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळाले. रामानुजान यांनी वयाच्या तीसव्या वर्षी मोठे यश संपादित केले होते. जगभर त्यांची ख्याती पसरली होती. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते.
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून भारतात परत आले. तेव्हा त्यांच्या आयुष्याचं शेवटचं वर्ष हे ठरलं. रामानुजन यांना आजारपणानी घेरलं होत. त्यांना क्षयाची असाध्य व्याधी झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी २६, एप्रिल १९२० रोजी या महान गणिततज्ज्ञने अखेरचा श्वास घेतला. रामानुजनच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले. इतक्या छोट्याशा आयुष्यात रामानुजन गणित विषयात महान अशी कामगिरी करून गेले.