गूगलकडून सर्व मराठी भाषा प्रेमींसाठी आनंदाची बातमी

इंटरनेटच्या जगतात खऱ्या अर्थाने मराठीला मानाचं स्थान मिळालं, असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही.

Updated: Sep 14, 2019, 12:03 AM IST
गूगलकडून सर्व मराठी भाषा प्रेमींसाठी आनंदाची बातमी title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : गूगल अॅडसेन्सच्या अधिकृत भाषेच्या यादीत आता मराठी भाषा आली आहे. मराठी भाषकांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंटरनेटच्या जगतात खऱ्या अर्थाने मराठीला मानाचं स्थान मिळालं, असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. कारण यापूर्वी गूगलने बंगाली, तमिळ या भाषांना अॅडसेन्समध्ये अधिकृत भाषेच्या यादीत स्थान दिलं होतं. यामुळे मराठी संकेतस्थळांना गूगलकडून येणाऱ्या जाहिराती मिळणार आहेत.

गूगलच्या दृष्टीकोनातून बंगाली बांगलादेशातही बोलली जाते, तसेच तमिळचा वापर श्रीलंकेतही असल्याने त्या भाषांचं महत्व होतं, यानंतर हिंदीला या यादीत स्थान मिळालं. आता मराठी भाषेच्या संकेतस्थळालाही ऍडसेन्सच्या जाहिराती लावता येणार आहेत. 

मराठी वाचक आणि मराठी साहित्य निर्माण करणाऱ्यांचं हे यश म्हणावं लागेल. तर दुसरीकडे फेसबूकने सुरू केलेल्या इन्स्टंट आर्टिकलमुळे, सर्व भाषेत चालणाऱ्या संकेतस्थळांना महसूल मिळण्यास सुरूवात झाली आहे. गूगलाही आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या, लिहिल्या जाणाऱ्या मराठी भाषेची गरज वाटायला लागली आहे.

गूगलने हा निर्णय घेतल्यामुळे मराठी भाषा इंटरनेटवर अधिक वाढीस लागणार आहे. प्रत्येक संस्थेला संकेतस्थळ चालवताना जाहिरातीतून आर्थिक मोबादला मिळणे अत्यावश्यक असते. गूगल अॅडसेन्ससाठी मराठी देखील आता अधिकृत भाषा झाल्याने, मराठी संकेतस्थळांचा आर्थिक कणा मजबूत होणार आहे. 

गूगल अॅडसेन्सने मराठी वेबसाईटला जाहिरात देण्यासाठी अनुकूलता दाखवल्याने, मराठी वेबसाईटना चांगले दिवस येणार आहेत.

ज्या भाषेत अधिक दर्जेदार लिखाण अशा भाषांना अधिक जाहिरातींचा लाभ होतो. असं साहित्य सर्च इंजीनला नेहमीच लवकर सापडतं. यामुळेच वाचकांचा ओघ अशा बातम्यांवर अशा माहितीवर अधिक असतो. पण ज्या भाषेत किंवा संकेतस्थळावर असत्य, अविश्वसनीय माहिती असेल, तसेच दुसऱ्या वेबसाईटवरून कॉपी केलेली माहिती असेल, अशा बातम्या सर्च इंजीनला मागे पडतात.

तुमचं संकेतस्थळ असेल, तर तुम्ही गूगल अॅडसेन्सकडे ऑनलाईन अर्ज करा. यानंतर गूगलकडून तुमच्या संकेतस्थळाचा दर्जा तपासला जाईल. ज्या संकेतस्थळावर चोरीचा किंवा अविश्वसनीय, १० ते २० लेख लिहून अपडेट नसेलली वेबसाईट असेल, अशा संकेत स्थळांना गूगल मान्यता देत नाही. 

१७ वर्ष जाहिरातींशिवाय मराठी संकेतस्थळ चालवणारा युवा संपादक harshad khandare

'मराठीमाती डॉट कॉम' या संकेत स्थळाचे संस्थापक आणि युवा संपादक हर्षद खंदारे यांनी आनंद व्यक्त केला आहे. हर्षद खंदारे यांनी १७ वर्षापासून हे संकेतस्थळ गूगल अॅडसेन्सच्या जाहिरातींशिवाय चालवलं आहे. 

गूगलच्या या निर्णयावर हर्षद खंदारे म्हणतात, 'गुगलची अडसेन्स ही प्रकाशकांसाठी जाहिरात पुरविणारी उपसंस्था आहे. जगभरातील बहुसंख्य ऑनलाइन जाहिरात कंपन्या या गुगल अडसेन्स द्वारे प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींचा मूळ स्रोत आहे असे म्हणता येईल.'

तसेच याच गूगल अॅडसेन्सने आता आपल्या जाहिराती प्रकाशित करण्यासाठी मराठी भाषेला देखील मान्यता दिली आहे, हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे, अॅडसेन्सच्या माध्यमातून मराठी भाषेतील संकेतस्थळांना गुगलने नवसंजीवनी दिली आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

दर्जेदार मराठी संकेतस्थळे, ब्लॉग्ज, फोरम या सर्वांना आता आपल्या ऑनलाइन माध्यमांवर पैसे कमावण्याची संधी मिळाली आहे.

 गूगल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रातल्या मातीतल्या मराठी भाषेला अधिकृतरित्या स्थान दिल्याने जगभरातील मराठी भाषिक नेटकाऱ्यांच्या अपेक्षा, आत्मविश्वास उंचावला आहे. 

- हर्षद खंदारे..  संस्थापक, संपादक मराठीमाती डॉट कॉम