close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सर्पविष : विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता

साप चावला म्हणजे मृत्यू अटळ असा अनेकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे. कारण तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी यावर ते अवलंबून असतं. 

Updated: Jul 11, 2017, 12:38 AM IST
सर्पविष : विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता

अमित गडगे, झी 24 तास, मुंबई : साप चावला म्हणजे मृत्यू अटळ असा अनेकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे. कारण तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी यावर ते अवलंबून असतं.

जर विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता, पण त्यासाठी तुम्हाला वेळेवर त्यावरचं औषध म्हणजे प्रतिसर्पविष मिळायला हवं. पूर्वीदेखील सर्पदंशाच प्रमाण होतं. काही राजेतर सर्पविषाचा वापर हत्यार म्हणूनही करायचे. त्याकाळात सर्पविषावर काही वनौषधी वापरल्या जायच्या. 

आजही साप पकडणारी केरळमधली इरुला नावाची जमात या वनौषधींचा वापर करते. काही आयुर्वेदीक उपचारप्रणालीत फटांगरा, कसांगरी, करकांगवण या वनौषधींचा सर्पदंशावर वापर करण्याबाबत उल्लेख होतो. मात्र त्याला कोणतेही शास्त्रीय प्रमाण नाही. त्यामुळे सध्यातरी सर्पदंशावर एकमेव प्रमाणित औषध म्हणजे प्रतिसर्पविष (Antivenin) हे औषध प्रत्येक सरकारी दवाखान्यात उपलब्ध असते आणि शिरेवाटे शरिरात विशिष्ट प्रमाणात दिलं जातं. प्रतिसर्पविष या प्रमाणीत औषधाचा शोध सर्वात प्रथम फ्रान्समध्ये लागला.

1895 मध्ये फ्रान्समधल्या पाश्चर इन्स्टिट्युटमध्ये Leon Albert Calmette यांनी प्रतिसर्पविष तयार केलं. कबुतरं, गिनिपीग यांच्या शरीरात त्यांनी विषाची अल्पमात्रा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं रक्त सर्पदंश केलेल्या गिनिपीगमध्ये चढवलं. हे रक्त चढवल्यानं सर्पदंश झालेल्या गिनिपीगवर सापाच्या विषाचा परिणाम होत नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर जगभर यावर संशोधन सुरु झालं. 

आजही सर्पविषावर संशोधन सुरु आहे. भारतात प्रमाणित प्रतिसर्पविष बनलं 1901 मध्ये. मग 1905 पासून कसौली (हिमाचल प्रदेश) इथल्या प्रयोगशाळेत प्रतिसर्पविष बनवण्याचा धडाका सुरु झाला. या प्रयोगशाळेचं नाव आहे केंद्रीय अनुसंधान संस्था. मुंबईतील परळच्या हाफकीन संस्थेतही यावर काम सुरु असतं. 

प्रतिसर्पविष कसं बनतं?
प्रतिसर्पविष तयार करण्यासाठी सापाच्या विषाची गरज लागते. स्नेक वेनम बँकेतून ही गरज भागवली जाते. सापांचं विष काढल्या नंतर उणे 20 डिग्री तापमानात ते गोठवलं जातं त्यातलं पाणी काढून ते सुकवलं जातं. नंतर हे विष प्रयोगशाळेत पाठवतात. आपल्याकडे प्रतिसर्पविष बनवण्यासाठी घोडा, खेचर किंवा मेंढ्यांचा वापर केला जातो. त्यासाठी हे प्राणी निरोगी असावे लागतात. 

प्रामुख्याने घोडे आणि खेचरांचा वापर अधिक होतो. निरोगी घोड्याच्या मानेच्या मागील भागात किंवा त्याच्या शेपटाकडील चरबीदार भागात (rump) मध्ये विशिष्ट प्रमाणात (इथं मुद्दाम प्रमाण सांगत नाही) सापाचं विष टोचलं जातं. हे प्रमाण इतकं कमी असतं की यामुळे प्राण्याला कोणतिही इजा होत नाही. या विषात काही केमिकल्स मिसळतात ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. त्यानंतर दर आठवड्याला ही मात्र ठरावीक पटीनं वाढवली जाते त्यानंतर तीन महिन्यात या प्राण्याच्या शरीरात विषविरोधी प्रतिकारशक्ती नर्माण होते. या प्राण्याच्या शरिरातील रक्त काढलं जातं. त्या रक्तातील तांडब्या आणि पांढऱ्यापेषी वेगळ्या केल्या जातात या पांढऱ्या पेशी म्हणजेच प्रतिसर्पविष. 

हे प्रतिसर्पविष ठरावीक तापमानात साठवलं जातं आणि एका विशिष्ट मशीनद्वारे त्यातील पाणी काढून पावडर तयार केली जाते. असं प्रतिसर्पविष 2 ते 3 वर्ष टिकतं. सलाईन सोल्यूशन टाकून त्याला पुन्हा द्रवरुपात आणलं जातं आणि वापरलं जातं. पूर्वी वेगवेगळ्या जातीच्या सापाच्या दंशावर वेगवेगळं प्रतिसर्पविष बनवलं जायचं मात्र आता यावर संशोधन करुन 1944 साली भारतातील चार प्रमुख सापांवर एकच प्रतिसर्पविष तयार केलंय. परळ(मुंबई) इथल्या हाफकीन संस्थेनं हे पोलिवेलंट तयार केलंय. आता या पोलिवेलंटमध्ये कोणते घटक असतात? प्रतिसर्पविष देताना कसं देतात? त्यासाठी काय काळजी घ्यायची हे पाहूया पुढील भागात...
अमित गडगे झी 24 तास.