१) रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता काढलेल्या अंत्ययात्रेत कुठलाही मोठा तामझाम नव्हता... साधी फुलांनी सजवलेली लहानशीच गाडी ज्यातून टाटांचं पार्थिव स्मशानभूमीत अवघ्या १५ ते २० मिनीटांत पोहोचलं... एवढा मोठा इतिहास घडवणारा उद्योगपती पण, त्याची अंत्ययात्रा सामान्य मुंबईकराची कोंडी करणारी , त्यांची नेहमीची गती कमी करणारी नव्हती...
२) स्मशानभूमीत सुरुवातीला मोजके १५० लोकच उपस्थित होते... सुरुवातीला सामुहिक शांती प्रार्थना झाली... `कोणताही धार्मिक विधी न करता´ शांतपणे पार्थिव विद्युतदाहिनीत नेलं गेलं...
३) टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हिआयपी स्मशानभूमीबाहेर आले... आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत आला... काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली... तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला... शांतनु सर, शांतनु सर´ अश्या हाका गेल्या...चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनु नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला everything is over´... केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला.. आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले
४) शांतनु मान खाली घालुन, मिडीयाला काहीच उत्तर न देता बाहेर आला... एकाही कॅमेराकडे शांतनुनं साधी नजरही फिरवली नाही...बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली... अमित शहा आणि इतर व्हिआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या... त्यात शांतनुची बाईकही कुठेतरी गेली... शांतनु हळु आवाजात आपल्या सहका-याला म्हणाला-
`टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है´ ... बाईक हरवलेल्या शांतनुला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनुच्या तोंडुन निघालं -
`टॅक्सी´से जाते है... स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच... शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनु तिथुन गेला
५) या प्रसंगानंतर मात्र माझं लक्ष गर्दीतल्या काही चेह-यांनी वेधलं... माझ्यासकट अनेकजण तिथे असे होते की ज्यांना तिथला माहौल मोबाईलमध्ये टिपायचा होता... काही जण मात्र कमालीचे स्तब्ध आणि शून्यात नजर लावलेले होते... समोरुन टाटांचं पार्थिव गेलं , पोलिसांनी रायफलचे तीन राऊंड झाडत मानवंदना दिली पण यांचे कॅमेरे वर आलेच नाहीत- त्यांचे हात मोबाईलवर नव्हते तर दोन्ही हात जोडलेले होते...डोळ्यांच्या कडा भिजलेल्या होत्या...
६) त्यांपैकीच एकजण पटन्याहून १५ दिवसांपूर्वीच टाटांना भेटायला आलेला- साधारण तीशीचा हा तरुण सॅनिटरी पॅडच्या स्टार्टअपसाठी टाटांची मदत मागायला मुंबईत आला होता... ईमेलवरुन अपॉईंटमेंट ठरत असतांना टाटा आजारी पडले... तरुणाला काही दिवस वाट बघ सांगितलं आणि वाट बघता बघताच टाटा गेले... भेट झालीच नाही
७) एक जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून हैदराबादहून मुंबईत पोहोचला... हा पण तिथला लहानसा उद्योजकच... मी माझ्या घरात टाटांचा फोटो लावतो म्हणाला
८) एकजण ठाण्यात मिस्त्री काम करणारा, एकजण पुण्यातला रिक्षावाला आणि एकजण टाटांच्याच कंपनीत बड्या हुद्द्यावर काम करुन रिटायर्ड झालेला... एकमेकांचं कधीच तोंड न पाहिलेली ही माणसं अक्षरश: एकमेकांच्या गळ्यात पडून रडली... यांना जोडणारा समान दुवा होता तो टाटांचा हात...या प्रत्येकाच्या आयुष्याला टाटा या नावानं कलाटणी दिली होती... रिक्षावाल्याला प्रशिक्षण मिळाल्यानं चांगला जॉब मिळणार होता, मिस्त्री कामगाराला कॅन्सरमधून जिवनदान मिळालं होतं, आणि हायप्रोफाईल रिटायर्ड व्यक्तीला जगण्यातलं समाधान मिळालं होतं
९) अनेकांना रतन टाटांचं शेवटचं दर्शन तर झालं नाहीच...पण रतन टाटांच्या शरीराचा अखेरचा स्पर्श ज्याला झालाय- त्या अंत्ययात्रेसाठी वापरलेल्या गाडीला हात लावून अनेकांनी नमस्कार केला... त्या गाडीला सजवलेली फुलं, त्यांची पाकळी घेऊन या लोकांनी आपल्या पाकीटात ठेवली...
१०) टाटांच्या ताज हॉटेलचा संपूर्ण स्टाफ अंत्यविधीवेळी उपस्थित होता... आणि तिथेही हा हॉटेलचा स्टाफ स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांना टाटा मिनरल वॉटरच्या बाटल्या देऊन
`टाटांचंच पाणी´ पुरवत होता...