गायत्री पिसेकर : त्या आल्या, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं...हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली. ती गोष्ट म्हणजे आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या अडीच महिन्याच्या तान्हुल्या बाळाला घेऊन केलेली दमदार एन्ट्री...
शीर्षकाप्रमाणे आई आणि आमदार या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या निभावणं हे तितकचं कठिण काम... मात्र सरोज अहिरे ताईंनी हे करून दाखवलं...
एक आमदार म्हणून त्यांनी समाजातील महिलांपुढे हा एक चांगला आदर्श ठेवला आहे. कारण आपण पाहतो, समाजाचे दोन भाग, एका भागात खासकरून शहरी भागात सुशिक्षित भागात महिला स्वत:च करिअर घडवतात. आपआपल्या क्षेत्रात नवनवीन शिखर गाठतात.
तर दुसरीकडे ग्रामीण भागात महिलांना नोकरी किंवा स्वत:च्या पायावर उभं राहू दिलं जात नाही... कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं कारण पुढे करून त्यांना पुढे येण्याची संधी दिली जात नाही. किंवा अजूनही निम शहरी भागात, अगदी स्वत:ला आधुनिक म्हणवणाऱ्या, सर्वसोयी सुविधांनी सज्ज असलेल्या घरातही वैचारिक मागसलेपणा पाहायला मिळतो. "लग्न झाल्यावर कशाला करायची नोकरी? नवरा चांगलं कमावतो, कुटुंब सधन आहे. असे कितीसे पैसे कमावणार तुम्ही" असे प्रश्न विचारून त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं...
करिअर करणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा टप्पा येतो. मुलंबाळं झाल्यावर घरातली जबाबदारी पार पडताना करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागतो किंवा काही जणींना कायमची एग्झिट घ्यावी लागते. ब्रेक घेतला की तेवढ्या कालावधीत मागची पाटी सपाट झाली असते, पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. काही महिने किंवा कालावधीनंतर पुन्हा नोकरी करावी म्हटलं तर नोकरीची संधी मिळतेच असं नाही. सरकारी नोकरी किंवा चांगल्या कंपनीतील नोकरी असली की मॅटनिटी लिव्ह पॉलिसीनुसार काही महिने सुट्टी मिळते. नोकरी पुन्हा रूजू व्हावं लागतं. मात्र, लगेच नोकरीवर रुजू होणं प्रत्येकीला जमतंच असं नाही, कारण रुजू झालं तरी घरी आपलं बाळ कसं असेल, काय करत असेल याकडे लक्ष वेधलं असतं.
नागपूर विधान भवनाच्या आवारात बाल संगोपन केंद्र सुरु करण्यात आलंय. हे स्तुत्य पाऊल आहे. अनेक मल्टीनॅशनल कंपनीजने ही संकल्पना सुरु केली आहे. मात्र, प्रमाण फार कमी आहे. कामाच्या ठिकाणी बाळाला घेऊन जाणं प्रत्येकीच्या बाबतीत वर्कआऊट होईलच असे नाही. मात्र, जर तशी सोय उपलब्ध असली तर परिस्थितीनुसार अनेक महिलांना या गोष्टीचा फायदा होईलच.
एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सरोज ताई यांचे विचार ही कौतुकास्पद आहेत. त्या म्हणतात, "मतदारसंघाचे, महिलांचे, राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न मांडण्याची संधी अधिवेशनात मिळते. राज्यस्तरीय सभागृहात सगळ्यांच्या उपस्थितीत हे प्रश्न मांडता येतात. इतरांची भाषणं, प्रश्न ही ऐकता येतात. उत्तरे ऐकण्याचीही संधी असते. म्हणूनच त्या आपल्या बाळाला अधिवेशनाला घेऊन आल्या". आईचं कर्तव्य बजावताना त्या आपलं आमदारकीचं कर्तव्य विसरल्या नाहीत.
ज्याप्रमाणे हिंदीत म्हण आहे "हर कामयाब इंन्सान के पिछे एक औरत का हात होता हैं", त्याच प्रमाणे कतृत्ववान महिलांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांची मिळणारी साथ ही तितकीच मोलाची आहे. सरोज ताईंचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सोबत त्यांच्या सासूबाई कल्पना वाघ यासुद्धा बाळासोबत आल्या होत्या. एरव्ही सामान्य कुटुंबात "काय गरज आहे. मूल लहान आहे. तुला मुलापेक्षा काम जास्त महत्त्वाचं आहे का? कशी निर्दयी आई असेल ही. आपल्या मुलाला टाकून कामावर गेलीय." अशाप्रकारचे संवाद सर्रास होत असतात. मात्र, डॉ. वाघ आणि त्यांच्या आईची अहिरे ताईंना लाभलेली सोबतही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांची ही कृती एक संदेश नक्कीच देऊन जाते. कुटुंब सधन, सुखवस्तू असणं गरजेचं नाहीये तर प्रगतीसाठी पोषक वातावरण असणं गरजेचं आहे. आईचं कर्तव्य बजावताना तिला तिचं अस्तित्वं टिकवणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण असं म्हणतात एक जिजाऊचं शिवबाला घडवू शकते...
विशेष नोंद : वरील माहिती ही बातमी नसून ब्लॉग आहे. ब्लॉगमधील मतं लेखिकेची वयक्तिक मते आहेत आहेत.