प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : दर्शन मनोज कोळी, इयत्ता ५ वीमध्ये शिक्षण घेणारा उमदा विदयार्थी. ढिम्म आणि निब्बर प्रशासकीय यंत्रणेमुळे त्याला जीवानिशी मुकावे लागले. साहूर या छोट्याश्या गावातून त्याला जागतिक भरारी घेऊन आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करायचे होते. त्याचे हे स्वप्न एका एसटी बसने हिरावून घेतले. दर्शनचा मृत्यू, तो ज्या खासगी वाहनाने शाळेत जात होता, त्याच वाहनाच्या चाकाखाली आल्याने झाला. दर्शनाचे दुर्दैव आणि आक्रोशाची हकीकत मन सुन्न करणारी आहे.
दर्शन शिंदखेडा तालुक्यातील साहूर या तापी नदी काठी असलेल्या गावातील विद्यार्थी. त्यांच्या सोबत या गावात शंभराच्या घरात मुलं आहेत, जे शिक्षणाच्या ओढीने अन्य गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये जातात. मात्र त्यांच्या या शिक्षणात सर्वात मोठा अडसर आहे, ती एसटी बस.
गावाचा रस्ता खराब असल्यामुळे एसटी महामंडळाने साहूरची बस सेवा बंद केली. ही बस सेवा बंद झाल्यामुळे शिक्षणासाठी शाळेत जायचे कसे? असा प्रश्न उभा राहिला. मग अनेकांनी खासगी वाहनाचा सहारा घेतला.
वाहन खासगी असल्याने, त्यात किती प्रवाशी, विद्यार्थी बसवायचे याचे बंधन नाही, ना कुठला सुरक्षा निकष पूर्ण करायचा. जीव मुठीत घेऊन असुरक्षित प्रवास करून शिक्षण घ्यायचे असा साहूरच्या मुलांचा नित्य क्रम. हाच नित्य क्रम आज (गुरुवारी ) दर्शनच्या जीवावर उठला.
तो ज्या रिक्षाने धमाणे गावातील माध्यमिक शाळेत जात होता, त्याच रिक्षाच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृतीव झाला. हा प्रथमदर्शनी अपघात आहे मात्र हा अपघात घडण्यामागच्या कारणाचा शोध घेतला तर दर्शनचा खून झाला आहे असे म्हणावे लागेल.
गावात बस सुविधा सुरु व्हावी यासाठी दर्शन, त्याच्यासोबतचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यन करत होते. काही महिन्यांपूर्वी तर दर्शनने जिल्हाधिकारी कार्यालयात बससाठी आंदोलनही केले होते, त्यावेळी सन्माननीय खुर्ची उबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याचे आश्वासन देत, पुन्हा असे आंदोलन केले तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे सांगतात.
मात्र त्यावेळी नावाला बस सुविधा सुरु करण्यात आली आणि पुन्हा रस्ता चांगला नाही म्हणून ती बंद करण्यात आली. रस्त्याचे काम व्हावे यासाठी मग ग्रामस्थांनी संघर्ष सुरु केला. भांड-भांड भांडून अखेर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला.
रस्ता होणार, बस येणार आणि शिक्षण सुरक्षित होणार, असा विश्वास निर्माण झाला आणि त्याचवेळी राजकारणाची माशी शिंकली. रस्त्यासाठी मंजूर निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचे साहूर ग्रामस्थांना कळाले. मग हा निधी अन्यत्र वळू नये यासाठी पाठपुरावा सूरु होता.
बस येत नाही, म्हणून शिक्षण अपूर्ण सोडता येत नव्हते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, या विचाराने दर्शन आणि त्याच्यासोबतचे मुलं खूप शिक्षण घ्यावे आणि गावाचा कायाकल्प करावा यासाठी झगडत होते.
शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून खासगी रिक्षाने साहूर ते धामणे प्रवास करत होते. मात्र या रिक्षात गरजेपेक्षा जास्त गर्दी नेली जात होती, या प्रवासात जीव धोक्यात आहे, हे विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना कळत होते मात्र पर्याय नाही, करणार काय ? या हतबलतेने मुलांना रिक्षात शाळेत पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता.
ज्याची भीती होती तेच घडले, ज्या रिक्षाने गुरुवारी दर्शनाला चाकाखाली चिरडले. त्याच रिक्षात तो बसला होता. त्याच रिक्षाच्या मागच्या चाकात आल्याने तो चिरडला गेला. एका उमद्या विद्यार्थ्यांचा अंत झाला.
महानगरांमध्ये असा कोणी एक विद्यार्थी मेला असता, तर तोबा चर्चा झाली असती. निषेध नोंदवला गेला असता. प्रशासन खळबळून जागे झाले असते, मात्र दर्शनचा मृतीव हा मेट्रो शहरात झाला नाही, तो एका छोट्याश्या खेडे गावात झाला, त्यामुळे त्याच्या जाण्याने कोण किती हादरले आणि जागे झाले? हा प्रश्नच आहे.
पण दर्शनचे जाणे अधिक सोस देणारे आहे, कारण तो अश्या भागातून चिकाटीने शिक्षण घेत होता जिथे उज्वल भविष्याची पहाट त्याला उदयाला आणायची होती.
दर्शन गेला, आक्रोश झाला, संतप्त ग्रामस्थांनी त्याचा देह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. मग जाग आली प्रशासनाला. अधिकारी जमा झाले. हा मृतीव गंभीर आहे, असे व्हायला नको, अशा एक ना अनेक बाता करीत संतप्त ग्रामस्थांना अधिकाऱ्यांनी धीर दिला.
बस सेवा सुरु करण्याचे आणि रस्त्याचे काम करण्याचे मागचेच आश्वासन नव्याने देऊन मोकळे झाले. आता पुन्हा बस सुरु होईल, मग बंद होईल आणि दुसरा कोणता तरी दर्शन शिक्षणासाठी जग सोडेल.
शिक्षणाच्या ओढीने धपडणाऱ्या कुठल्याही मुलाचा असा दुर्दैवी मृतीव होऊ नये. आणि जी संवेदना महानगरातील मुलांसाठी आहे तीच संवेदना ग्रामीण भागासाठी व्यवस्थेत निर्माण व्हावी एवढेच.