सुधीर सुर्यवंशी, मुंबई : शिवसेनाप्रमुख, ज्यांनी मराठी मनावर अनेक वर्षे राज्य केले ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अनेक वेळा सभांमधून मिश्कीलपणे ‘बारामतीचा तेल लावलेला पहिलवान’अशी उपमा देत. ते नेहमी म्हणत की हा पहिलवान भल्याभल्यांच्या तावडीत आला नाही आणि ज्याने याला तावडीत घेण्याचा प्रयत्न केला तो त्याच्यातून अलगदपणे बाहेर पडला.
पाच दशकांच्या राजकीय जीवनात दाऊद इब्राहिमपासून तेलगीपर्यंत तसेच भूखंडघोटाळ्यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप शरद पवार यांच्यावर झाले. पण शेवटी कुठल्याही आरोपात तथ्य निघाले नाही आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे बारामतीचा पहिलवान आजही कुठलाही डाग नसलेला राजकीय पहिलवान आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेक वर्षे राज्य केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल हे जवळजवळ निश्चित आहे.
परंतु भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नसल्यामुळे राज्य शिखर बँकेच्या २५००० कोटींच्या घोटाळ्याशी संबंध जोडून शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस बजावण्यात आली.
भाजपच्या रणनीतीनुसार एकदा का हा बारामतीचा ऐंशी वर्षांचा तरुण पहिलवान बाद झाला की २०१९ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे जिंकता येईल आणि भाजपच्या राजकीय वाटचालीत कुठल्याही प्रकारचा अडसर राहणार नाही.
ज्या ठिकाणी कधी कमळ फुलले नाही त्या भागातही कमळ फुलवण्याचा चंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बांधला व त्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेते फोडून आपल्या पक्षात घेतले.
याचाच भाग म्हणून, पंतप्रधान मोदी अमेरिकेत असताना शरद पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली, असे समजते. एकदा शरद पवार अडकल्यानंतर, भाजपला केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळेल आणि विरोधक पूर्णपणे नष्ट होऊन जातील, असा त्यामागे होरा दिसतो.
शरद पवारांचे वय वाढले असले तरी राजकीय इच्छाशक्तीने व बुद्धीने ते तरतरीत आहेत. आजसुद्धा तरुणांना लाजवेल अशी दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांबरोबर अनेक शारीरिक व्याधींवरही यशस्वीपणे मात केली आणि आपले राजकीय आणि सामाजिक जीवन पुढे चालू ठेवले.
हे सुरू असताना भाजपने पवारांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला, पवारांचे एकेकाळचे खंदे समर्थक मधुकरराव पिचड यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले.
तसेच छत्रपती शिवाजीमहाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन दुसऱ्याच दिवशी अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांचा दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करून घेतला.
इतकेच नव्हे, तर पवारांचे समर्थक आणि नातेवाईक पद्मसिंह पाटील यांनीही पवार संकटात असताना, त्यांना साथ न देता आपल्या राजकीय सुरक्षेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यांना पवारांनी मोठे केले ते सर्व जुने-नवे सहकारी पवार अडचणीत असताना सोडून गेले.
या सर्व परिस्थितीत नाराज न होता, धीर न सोडता वयाच्या ऐंशीव्या वर्षी पुन्हा व्हेंटिलेटरवर असलेल्या राष्ट्रवादीची धुरा शरद पवारांनी आपल्या हातात घेतली आणि पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली. यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला.
मुख्यतः तरुणवर्ग हा ऐंशी वर्षांच्या नेत्याकडेही आकृष्ट होऊ लागला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये समाविष्ट होण्याची चर्चा थांबली. राष्ट्रवादी निवडणुकीत पूर्ण पराभूत न होता काही जागा मिळवेल असे राजकीय पंडितांना वाटू लागले आहे.
ईडीची नोटीस मिळाल्यानंतर बावरून न जाता शरद पवार यांनी या प्रकरणाला वेगळीच कलाटणी देण्याचे ठरवले. ईडीकडून चौकशीसाठी अधिकृत बोलवणे नसताना त्यांनी स्वतःहून शुक्रवारी ईडी ऑफिसमध्ये जाण्याचे आणि ईडी देईल तो पाहुणचार घेण्याचे जाहीर केले.
या चौकशीत किंवा कथित घोटाळ्याशी आपला काडीमात्र संबंध नाही, हे सहकारक्षेत्र कोळून प्यायलेले शरद पवार छातीठोकपणे सांगतात. त्यामुळे या चौकशीचा उपयोग आपल्या पक्षाच्या उभारणीसाठी करण्याचे त्यांनी ठरवले.
शरद पवारांच्या पाच दशकांच्या राजकारणात दुसऱ्यांदा त्यांना अशा प्रकारची नोटीस आली आहे. या नोटिशीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पवारांनी आता व्हिक्टिम कार्ड वापरण्यास सुरुवात केली आहे.
१९८० मध्ये शरद पवार यांना पहिल्यांदा अशा प्रकारे गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याकाळात पवारांचा काँग्रेस युनायटेड हा पक्ष असाच रसातळाला गेला होता आणि तेव्हाही पवारांची काँग्रेस संपेल, पवार राजकारणातून बाद होतील अशी चर्चा सुरू झाली होती.
यावर मात म्हणून शरद पवार यांनी १९८० मध्ये शेतकरी दिंडी काढून जळगाव ते नागपूर असा ४८० किलोमीटर पायी प्रवास करण्याचे ठरवले. यात पवारांना पाठिंबा मिळणार नाही असा कयास सुरुवातीला प्रसारमाध्यमांतून लावण्यात आला.
परंतु पहिल्याच दिवशी पाच हजार शेतकरी व मजूरवर्ग पवारांच्या दिंडीत सामील झाला आणि आणि जसजशी दिंडी पुढे जाऊ लागली तसतसा कारवाँ वाढत राहिला आणि पवारांना पुन्हा मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद मिळू लागला.
याचाच भाग म्हणून त्यांच्यावर खटलेही दाखल करण्यात आले, पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि शरद पवार त्या खटल्यांमधून सुखरूप बाहेर पडले आणि त्यांनी पुढील चाळीस वर्षे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात आपले स्थान पक्के केले.
‘ऑपॉर्च्युनिटी इन क्रायसिस’या उक्तीप्रमाणे पवारांनी आता ईडीचा उपयोग आपल्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी करण्याचे ठरवलेले दिसते. ईडीची नोटीस अजित पवार यांच्यापुरती मर्यादित राहिली असती तर त्याचा फायदा भाजपला झाला असता.
मात्र शरद पवार यांचे नाव आल्यामुळे त्यांच्याबद्दल ग्रामीण भागात तरुणांमध्ये सहानुभूती निर्माण होत आहे. ‘दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही’ अशी भावनिक साद पवारांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला घातली आहे, त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.
एकनाथ खडसे यांनी शिखर बँकेचे प्रकरण विधानसभेत उचलून धरले होते व त्यावेळेला त्यांना कुठेच शरद पवार यांचे नाव या बँकेच्या गैरव्यवहारात दिसले नाही. त्यांनी सुद्धा ईडीच्या नोटिशीबद्द्ल आश्चर्य व्यक्त केले आहे. या सर्व परिस्थितीत भाजप आणि शरद पवार कोणत्या राजकीय खेळी करतात हेही पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
साताऱ्यात पवार लढणार?
उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्याच्या जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. शरद पवार उभे राहिल्यास मी माघार घेण्यास तयार आहे, अशा प्रकारचे वक्तव्य उदयनराजे यांनी केले होते.
राज्यसभेची सध्याची टर्म संपल्यानंतर दिल्लीतली राजकीय कारकीर्द सुरू राहावी, यासाठी पवार साताऱ्यातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.